रांजणगावातून माय-लेकी बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:04 AM2021-04-23T04:04:51+5:302021-04-23T04:04:51+5:30
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथून मायलेकी बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. मनीषा मिलिंद ...
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथून मायलेकी बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. मनीषा मिलिंद गवई (२१) ही महिला १८ एप्रिलला आपली ३ वर्षांची मुलगी सांची गवई हिला सोबत घेऊन घरातून निघून गेली आहे. सर्वत्र शोध घेऊनही या मायलेकी मिळून न आल्याने सविता खंडाळे यांनी मुलगी व नात बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे.
--------------------
महावीरनगरात पाणीटंचाईचे संकट
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरातील महावीरनगरात पाणीपुरवठ्याचे नियोजन कोसळल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भागात तीन ते चार दिवसांआड अत्यल्प पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक जण पदरमोड करून टँकर खरेदी करून तहान भागवत आहेत. सिडको प्रशासनाचे पाणीटंचाईकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप त्रस्त नागरिकांनी केला आहे.
-----------------
दुभाजकावर कचऱ्याची विल्हेवाट
वाळूज महानगर : पंढरपुरातील रस्ता दुभाजकावर केर-कचरा आणून टाकला जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहेत. मुख्य रस्त्यावरील फळविक्रेते व नागरिक टाकाऊ भाजीपाला व केर-कचरा दुभाजकावर आणून टाकत असतात. या कचऱ्यामुळे दुभाजक व रस्त्यावर मोकाट जनावरांचा संचार वाढला आहे. दुभाजकावर केर-कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.
---------------------------------
नगर रोडवरील साईड पट्टे भरा
वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावरील पंढरपूर ते वाळूज या रस्त्यावरील, साईड पट्टे उघडे पडल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या साईड पट्ट्यांवरील मुरुम व माती वाहून गेल्याने या रस्त्यावर जवळपास अर्धा फुटाची खोल कपार पडली आहे. रात्रीच्या वेळी पाठीमागून येणाऱ्या वाहनांना साईड देताना अनेक वाहनधारक रस्त्यावरून खाली उतरताना अपघातही घडत आहेत. या रस्त्यावरील साईड पट्टे भरण्याची मागणी गुलाब दाभाडे, रविकरण शेजवळ, संदीप तुपे आदींनी केली आहे.
-----------------------------
वाळूजला ड्रेनेजलाईनचे काम कासवगतीने
वाळूज महानगर : वाळूजला ड्रेनेजलाईनचे काम कासवगतीने सुरू असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. क्लस्टरमधून गावात ड्रेनेजलाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र काम मंदगतीने सुरू असल्यामुळे ड्रेनेजलाईन टाकण्याची कामे केव्हा पूर्ण होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ड्रेनेजलाईनसाठी खोदकाम करण्यात येत असल्याने मलबा रस्त्यावर टाकला जातो. या मलब्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. हे काम वेगात पूर्ण करण्याची मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.
----------------