'माझी पोहोच मंत्रालयात'; व्यवस्थापन परिषद सदस्याच्या दबावानंतर विभागप्रमुखाचा राजीनामा
By राम शिनगारे | Published: July 9, 2024 07:28 PM2024-07-09T19:28:03+5:302024-07-09T19:30:43+5:30
अनेक आरोप करत, अधिवेशनाच्या माध्यमातून नोकरीतून काढू शकतो; असा दबाव टाकल्यामुळे दिला राजीनामा
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक डॉ. आनंद वाघ यांनी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांनी दबाव टाकल्यामुळे विभागप्रमुख पदाचा राजीनामा मंगळवारी (दि.९) दिला. हा राजीनामा मिळाला असल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.
डॉ. वाघ यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले की, ५ जुलै रोजी दुपारी ४.१६ वाजता प्रकुलगुरूंच्या दालनात बोलावून घेतले. त्याठिकाणी डॉ. सानप हे बसलेले होते. त्यांनी थेट 'तुम्ही महाविद्यालयांना विस्तार युनीट देताना टक्केवारी घेता, महाविद्यालयात जाऊन व्याख्यान देता, माझे हात मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत, अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून तुम्हाला नौकरीतून काढू शकतो आणि ८ जुलै रोजी तुमच्या चौकशीसाठी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत समिती नेमून त्या समितीचा अध्यक्ष होणार' असल्याचे सांगितले. डॉ. सानप यांनी बोलण्याची कोणतीही संधी दिली नाही. माझ्या विरोधात आतापर्यंत कोणत्याही महाविद्यालयातील प्राचार्यांनी कुलगुरू किंवा त्यांच्या कार्यालयाकडे तक्रार केलेली नाही. यानंतर ते कोणालाही माझ्या विरोधात तक्रार देण्यास लावू शकतात असेही डॉ. वाघ यांनी पत्रात म्हटले आहे.
जवळच्या व्यक्तीच्या नियुक्तीसाठी बदनामी
आजीवन शिक्षण व विस्तार विभागाच्या संचालकपदासाठी जाहिरात आलेली आहे. त्या पदासाठी डॉ. सानप यांच्या जवळच्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मुलाखतीसाठी निवड झालेल्यांची यादीही संकेतस्थळावर आहे. लवकरच मुलाखती होतील. त्यात माझ्या नियुक्तीला अडचण निर्माण व्हावी म्हणून त्यांनी बदनामी सुरू केल्याचेही डाॅ. वाघ यांनी म्हटले आहे.
४० पैकी ३५ महाविद्यालयात व्याख्यानाला गेले
डॉ. आनंद वाघ हे ४० पैकी ३५ महाविद्यालयात स्वत: व्याख्यानाला गेले आहेत. त्यांनी विद्यापीठासह संबंधित महाविद्यालयांकडून टीएडीए घेतला आहे. ही आर्थिक अनियमितता आहे. त्यांच्या विरोधात दोन महिन्यांपूर्वीच तक्रार दिलेली आहे. ८ जुलै रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा विषय मांडला होता. मात्र, कुलगुरूंनी प्रशासनाच्या पातळीवर चौकशी करणार असल्याचे सांगितले. चौकशी होणार असल्यामुळे डॉ. वाघ यांनी तक्रार केली असावी.
- डॉ. गजानन सानप, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य