‘माझा विठ्ठल’ चित्रप्रदर्शनाला चित्रपे्रमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:26 AM2017-10-30T00:26:03+5:302017-10-30T00:27:54+5:30
विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारलेली ‘विठुमाऊली’ची विविध रूपे पाहण्यासाठी शहरातील चित्रपे्रमींनी आणि विद्यार्थ्यांनी रविवारी प्रोझोन मॉल येथे एकच गर्दी केली होती. ‘लोकमत’ आणि ‘स्टार प्रवाह’ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘माझा विठ्ठल’ या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारलेली ‘विठुमाऊली’ची विविध रूपे पाहण्यासाठी शहरातील चित्रपे्रमींनी आणि विद्यार्थ्यांनी रविवारी प्रोझोन मॉल येथे एकच गर्दी केली होती. ‘लोकमत’ आणि ‘स्टार प्रवाह’ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘माझा विठ्ठल’ या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील निवडक चित्रे प्रोझोन येथील प्रदर्शनात पाहायला मिळाली.
राजा रवी वर्मा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. उदय भोईर, मेसमराईज गॅलरीचे संचालक दीपक देशमुख, रोहित क्रिएटिव्ह क्लासेसचे संचालक रोहित गिरी, हर्ष आर्ट क्रिएशनचे संचालक हरीश दहीहंडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला आणि कलात्मकतेला वाव देण्याचा उत्तम प्रयत्न करण्यात आला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलावर आधारित ‘विठुमाऊली’ ही नवी मालिका स्टार प्रवाहवर दि. ३० आॅक्टोबरपासून सायं. ७ वा. प्रसारित होणार आहे. भव्य-दिव्य अशी निर्मिती असलेली ही मालिका महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या कोठारे व्हिजन या निर्मिती संस्थेने तयार केली आहे. या मालिकेच्या निमित्ताने ‘माझा विठ्ठल’ ही अनोखी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. शहरातील हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या चित्रांतून रंगांची मुक्तहस्ताने उधळण करीत विठ्ठलाची अनेकविध रूपे
चितारली.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ देण्यासाठीच या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी आणि चित्रप्रेमींनी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट दिली. ‘माझा विठ्ठल’ स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा दि. ३० आॅक्टोबर रोजी सायं. ७ वा. स्टार प्रवाहवर ‘विठुमाऊली’ या मालिकेच्या पहिल्या भागात केली जाणार आहे.