युवकाच्या निर्घृण खुनाचे रहस्य उलगडले

By Admin | Published: September 14, 2015 11:57 PM2015-09-14T23:57:23+5:302015-09-15T00:34:10+5:30

वाळूज महानगर : पंढरपुरातील २० वर्षीय युवकाच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना यश आले असून,

The mystery of the innocent mother of the young man unravels | युवकाच्या निर्घृण खुनाचे रहस्य उलगडले

युवकाच्या निर्घृण खुनाचे रहस्य उलगडले

googlenewsNext


वाळूज महानगर : पंढरपुरातील २० वर्षीय युवकाच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना यश आले असून, खून करून फरार झालेल्या आरोपींना रविवारी रात्री पोलिसांनी अमरावती जिल्ह्यात अटक केली. अवघ्या २४ तासांत मारेकऱ्यांचा शोध लागल्यामुळे पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
वाळूज औद्योगिक परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून खुनाच्या घटना घडत असून, आतापर्यंत तिघांचा बळी गेला आहे. क्षुल्लक कारणावरून हे सर्व खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पंढरपुरातील देवगिरी बँकेच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत दीपक अशोक बनकर (२०, रा. सलामपुरेनगर, पंढरपूर) या युवकाचा दगड व हत्याराने खून करून मारेकरी फरार झाले होते. दरम्यान, मयत दीपक घटनेच्या काही वेळ आधी पंढरपुरात त्याच्या मित्रांसमवेत गप्पा मारत होता, अशी माहिती दीपकचा भाऊ विजय याने पोलिसांना दिली होती. घटनेनंतर त्याचे मित्र गायब झाल्यामुळे त्यांनी खून केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पोलीस पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली होती.
वडनेरा रेल्वेस्थानकावर आरोपी जेरबंद
दीपकचा खून करून आरोपी त्यांच्या मूळ गावी अमरावतीकडे पसार झाल्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांच्या शोधासाठी एमआयडीसी वाळूज ठाण्याचे पथक अमरावती जिल्ह्याकडे रवाना झाले होते.
संशयितांची नावे पोलिसांना मिळाल्यामुळे पोलीस पथकाने रात्री अमरावती जिल्ह्यातील वडनेरा रेल्वेस्थानकावर आरोपी आकाश परतेक (२५, रा. परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती, ह.मु. बकवालनगर) व सागर उइके (१९, रा. परतवाडा, जि. अमरावती, ह.मु. साईश्री कंपनी, वाळूज एमआयडीसी) यांना शिताफीने अटक केली. या आरोपींनी दीपकचा भांडणातून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली असून, या दोघा आरोपींना ताब्यात घेऊन सोमवारी सकाळी पोलीस पथक वाळूज औद्योगिक परिसरात परतले. या पथकात पोहेकॉ. परमेश्वर पायगव्हाणे, पोकॉ. बाबासाहेब काकडे, पोकॉ. किशोर काळे आदींचा समावेश होता.
क्षुल्लक भांडणातून झाला खून
दीपक, आकाश व सागर हे मित्र शनिवारी पोळ्याच्या दिवशी पंढरपुरात गप्पा मारत बसले होते. रात्री ते देवगिरी बँकेसमोरील उघड्या मैदानाजवळ गेले. या ठिकाणी तिघांमध्ये बाचाबाची सुरू झाल्यावर दीपक याने आकाशला थप्पड मारली. यामुळे संतप्त झालेल्या आकाश व सागर यांनी दीपक यास मारहाण करीत दोघांनी दोन दगड त्याच्या डोक्यात टाकले व ते पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या दीपक यास वेळीच उपचार न मिळाल्यामुळे तसेच खूप रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दोन्ही आरोपींनी दीपकचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
अवघ्या २४ तासांत या खुनाचे रहस्य उलगडण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना यश आले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार एम.बी. टाक करीत आहेत.

Web Title: The mystery of the innocent mother of the young man unravels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.