‘त्या’ खुनाचे गूढ उलगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:16 AM2017-12-13T01:16:38+5:302017-12-13T01:16:50+5:30
आपल्या वडिलांचे शेताशेजारी असलेल्या एका महिलेशी असलेले अनैतिक संबंध, त्या रखेलवर बाप करीत असलेली पैशाची उधळण, यावरुन घरात सुरु असलेले वाद, याचा राग आल्याने पोटच्या केवळ १९ वर्षीय मुलाने या ४० वर्षीय रखेलचा गळा आवळून खून केल्याची घटना तालुक्यातील मोढा बु. येथे रविवारी संध्याकाळी घडली होती. त्या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी खून करणारा मुलगा, त्याचा मित्र व बाप अशा तीन जणांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्लोड : आपल्या वडिलांचे शेताशेजारी असलेल्या एका महिलेशी असलेले अनैतिक संबंध, त्या रखेलवर बाप करीत असलेली पैशाची उधळण, यावरुन घरात सुरु असलेले वाद, याचा राग आल्याने पोटच्या केवळ १९ वर्षीय मुलाने या ४० वर्षीय रखेलचा गळा आवळून खून केल्याची घटना तालुक्यातील मोढा बु. येथे रविवारी संध्याकाळी घडली होती. त्या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी खून करणारा मुलगा, त्याचा मित्र व बाप अशा तीन जणांना अटक केली.
सदर महिलेचा खून करणाºया मुलाचे नाव समाधान पंढरीनाथ ढोरमारे (१९) असे आहे. तर अनैतिक संबध असलेल्या वडिलांचे नाव पंढरीनाथ जनार्दन ढोरमारे (५४) असे आहे. यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी समाधानला मदत करणारा मित्र गोपीनाथ जनार्दन निकम (२२, सर्व रा. मोढा बु.) यालाही अटक झाली आहे. पार्वताबाई देवीदास ढोरमारे या महिलेच्या मृत्यूप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सोमवारी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन तपास सुरु केला होता. यात खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन तासात आरोपींना अटक
या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, श्वान पथक, सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून खुनाचा उलगडा केला व अवघ्या दोन तासांत तिन्ही आरोपींना अटक केली.
चप्पलवरुन रहस्य उलगडले
मृतदेहाची विल्हेवाट लावताना गोपीनाथची एक चप्पल घटनास्थळी सापडली होती. श्वानपथकाने त्याचा माग काढला व गोपीनाथला ताब्यात घेताच सारे गूढ उकलले.
हा खून झाला त्यावेळी पंढरीनाथ हा तिच्याच शेतातील घरात होता. १०० ते २०० फुटावर मुलाने खून केला. याचा आवाज पंढरीनाथला आला नाही का, असा प्रश्न पोलिसांना पडला असून या खुनात पंढरीनाथ तर सहभागी नाही ना, या दिशेने पोलीस तपास करीत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भुजंग, सचिन कापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोडचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप सावले, सरीता गाढे, पोलिस कर्मचारी विलास सोनवणे, विठ्ठल चव्हाण, दादाराव पवार, विठ्ठल डोके, विकास नायसे, गुन्हे शाखचे पोलीस यांनी ही यशस्वी कारवाई केली.
असा केला खून
शेजारी -शेजारीच शेत असल्याने पंढरीनाथ व मयत महिलेचे सूत जमले होते. याची कल्पना पंढरीनाथच्या मुलाला होती. त्याने अनेक वेळा दोघांनाही समजावून सांगितले, पण उपयोग झाला नाही. रविवारी सकाळी सिल्लोडचा आठवडी बाजार असल्याने पंढरीनाथ या महिलेला मोटारसायकलवर घेऊन सिल्लोडला आला. तेथे बाजार करून त्याने तिला कपडे घेऊन दिले. याची कुणकुण समाधानला लागली अन् त्याने तिचा काटा काढण्याचे ठरविले.
रविवारी संध्याकाळी पार्वताबाई ही खरेदी करून शेतातील घरी जात असताना समाधानने तिला शेतात अडविले व तिचा गळा आवळून खून केला. आपल्या शेतात मृतदेह बघून पोलीस संशय घेतील म्हणून समाधानने मित्र गोपीनाथला शेतात बोलावले व घटना सांगितली व मृताची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करण्याचे सांगितले. त्याने आधी नकार दिला, नंतर मैत्रीखातर त्याने बाजूच्या भुजंगराव यांच्या शेतात असलेल्या विहिरीपर्यंत मृतदेह ओढत नेला व तो विहिरीत टाकणार तेवढ्यात कुणाच्या तरी पावलांचा आवाज आल्याने ते दोघे मृतदेह सोडून पळून गेले. चाणाक्ष पोलिसांनी हा गुन्हा अवघ्या दोन तासात उघड केला.