लघुउद्योजकाच्या गोळ्या झाडून हत्येचे गूढ अद्यापही कायम; मारेकऱ्याच्या शोधासाठी ८ पथके रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 12:45 PM2024-03-19T12:45:15+5:302024-03-19T12:45:46+5:30
लघु उद्योजक सचिन नरोडे याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर एमआयडीसी वाळूज व गुन्हे शाखेकडून त्याच्या ओळखीच्या लोकांची चौकशी करण्यात आली आहे.
वाळूज महानगर : साजापूर शिवारात रविवारी झालेल्या लघुउद्योजकाच्या हत्येचे गूढ कायम असून, गोळी झाडणाऱ्या अज्ञात मारेकऱ्याच्या शोधासाठी पोलिसांनी ८ पथके विविध ठिकाणी रवाना केली आहेत.
सचिन साहेबराव नरोड (३७, रा. बालाजीनगर, साजापूर) या लघुउद्योजकाची रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने डोक्यात गोळी मारून हत्या केली होती. या घटनेत सचिन नरोडे यांचा जागीच मृत्यू झाल्याने उद्योगनगरीत खळबळ उडाली होती. या हत्येनंतर पोलिसांनी ३ ते ४ जणांची चौकशी करून हत्येचे गूढ उकलण्याचा प्रयत्न केला. लग्न झाल्यानंतर त्याने देवगाव रंगारी येथे दुचाकी विक्रीचे शोरूम सुरू केले होते. दरम्यानच्या कालावधीत सचिन याचे पत्नीसोबत खटके उडू लागले. लग्नानंतर सचिन यास स्वरांजली ही मुलगी झाली. तिच्या जन्मानंतर सचिन याचे ग्रामीणमध्ये कार्यरत एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासोबत सूत जुळले. त्यामुळे सचिन व त्याच्या पत्नीतील वाद विकोपाला गेला व त्यांचा घटस्फोटही झाला.
घटस्फोट घेतल्यानंतर सचिन हा साजापुरात वडील साहेबराव, आई शोभा व मुलगी स्वरांजली यांच्यासह वास्तव्यास होता. साजापूरला आल्यावर सचिनने त्याच्या ओळखीच्या जुबेर पठाण यास व्याजाने ५ लाख रुपये काढून दिले होते. मात्र, जुबेरने घेतलेले पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने साहेबराव नरोडे यांनी लासुरचे घर विक्री करून व्याजासह ६ लाख २५ हजार रुपये भरले होते. सचिन याने वडगाव शिवारात कालिका इंटरप्रायजेस या नावाची कंपनी सुरू करून लोखंडी फर्निचर विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय डबघाईस आल्यानंतर सचिनने कंपनीतील मशिनरीही विक्री केली होती.
महिला पोलिस कर्मचाऱ्यासोबत लिव-इन रिलेशनमध्ये
पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर सचिन हा ग्रामीणमध्ये कार्यरत एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासोबत लिव-इन रिलेशनमध्ये राहत होता. अनेकदा सचिन हा प्रेयसीला घेऊन आपल्या घरीही येत होता. काही दिवसांपूर्वी सचिनने साजापुरात प्रेयसी महिला पोलिस कर्मचाऱ्यास एक कार व घरही खरेदी करून दिले व त्याचे हप्ते स्वत: सचिन भरत होता. दोन महिन्यांपूर्वी सचिनची कारही अज्ञात माथेफिरूने जाळली. तेव्हा सचिन व प्रेयसीत वाद झाल्याने ते अलिप्त राहात होते.
तपासासाठी पोलिसांची ८ पथके रवाना
लघु उद्योजक सचिन नरोडे याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर एमआयडीसी वाळूज व गुन्हे शाखेकडून त्याच्या ओळखीच्या लोकांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत ठोस पुरावे न मिळाल्याने त्याच्या हत्येचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांना वेगवेगळ्या दिशेने तपास करावा लागत आहे. रविवारी रात्री सचिन याची हत्या झाल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी वाळूज व गुन्हे शाखेचे प्रत्येकी ४ पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना केली असल्याचे एमआयडीसीचे निरीक्षक कृष्णा शिंदे व गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मयत लघु उद्योजकावर मूळगावी अंत्यसंस्कार
गोळीबाराच्या घटनेत ठार झालेल्या सचिन नरोडे याचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह सोमवारी अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सांयकाळी शिल्लेगाव येथे पोलिस बंदोबस्तात मयत सचिनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. या गोळीबाराच्या घटनेनंतर उद्योगनगरी चांगलीच हादरली आहे.