औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी एन. के. देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 05:50 PM2018-01-20T17:50:48+5:302018-01-20T17:51:11+5:30
वरिष्ठ उपशिक्षणाधिकारी एन. के. देशमुख यांनी आज शुक्रवारी दुपारी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला.
औरंगाबाद : वरिष्ठ उपशिक्षणाधिकारी एन. के. देशमुख यांनी आज शुक्रवारी दुपारी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. उपशिक्षणाधिकारी तथा तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांना अपंग समावेशित युनिटच्या पुनर्स्थापनेचे प्रकरण चांगलेच भोवले. यासंदर्भात चौकशी समितीने आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्यांना सादर केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी लाठकर यांच्याकडील शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार १५ जानेवारीला काढून घेतला.
जिल्हा परिषदेत सध्या सेवाज्येष्ठ उपशिक्षणाधिकारी म्हणून एन. के. देशमुख कार्यरत आहेत. मात्र, ते ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त होणार असल्यामुळे सेवाज्येष्ठ गटशिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांच्याकडे पुन्हा कार्यभार सोपविण्याची भूमिका आर्दड यांनी घेतली. मात्र, वाणी यांनी काही दिवस का होईन देशमुख यांच्याकडे शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार देऊन त्यांचा सन्मान राखावा, अशी भूमिका घेतल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने देशमुख यांच्याकडेच पदभार देण्याचा निर्णय घेतला. देशमुख हे वैद्यकीय रजेवर होते. त्यांना काल बोलावून घेण्यात आले. ते आज शुक्रवारी रजेवरून परतले व दुपारी त्यांनी शिक्षणाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली.
मोह आवरला नाही
तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्याकडील पदभार सोमवारीच काढून घेतला; पण त्यानंतरही त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या आदेशाला जुमानले नाही. त्यांनी आजपर्यंत शिक्षणाधिकार्यांची भूमिका बजावली. बुधवारी त्यांनी दिवसभर कार्यालयात बसून अनेक संचिका निकाली काढल्या. त्यांनी काल गुरुवारी पुणे येथे शिक्षण संचालनालयाच्या बैठकीला दिवसभर हजेरी लावली. या सारा घटनाक्रम पाहून शिक्षण विभागातील कर्मचारी हवालदिल झाले होते.