जिल्हाधिकारी कार्यालयाचे एन-ए परवानगीचे अधिकार संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 07:11 PM2019-08-13T19:11:36+5:302019-08-13T19:11:36+5:30

औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे  संचिका वर्ग 

N-A permitting authority of the Collector's office terminated | जिल्हाधिकारी कार्यालयाचे एन-ए परवानगीचे अधिकार संपुष्टात

जिल्हाधिकारी कार्यालयाचे एन-ए परवानगीचे अधिकार संपुष्टात

googlenewsNext
ठळक मुद्दे१५ ऑगस्टपासून कार्यालय सुरू 

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हद्दीतील ३१३ गावांतील अकृषकचे (नॉन अ‍ॅग्रीकल्चर / एनए), भोगवटा, बांधकाम परवानगी देण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकार १५ आॅगस्टनंतर संपुष्टात येणार आहेत. औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एएमआरडीए) कार्यालय १५ आॅगस्टपासून सुरू होणार असून, प्रभारी आयुक्त म्हणून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नगररचना विभागातील सर्व परवानगीच्या, भोगवटा प्रमाणपत्रांच्या संचिका प्राधिकरणाच्या कार्यालयाकडे वर्ग  करण्याचे काम शुक्रवारपासून सुरू झाले आहे. मंगळवारी आणि बुधवारी संचिका पूर्णपणे वर्ग करण्यात येतील. दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी सांगितले, जिल्हाधिकारी कार्यालयातील संचिका वर्ग करण्याचे काम सुरू आहे. २ आॅगस्ट रोजी एएमआरडीएच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सहा महानगर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, मार्च २०१७ मध्ये एएमआरडीएसाठी आकृतिबंध निश्चित झाला आहे. १५ जुलै २०१९ रोजी प्राधिकरणाची द्वितीय बैठक झाली.

बैठकीतील इतिवृत्तानुसार कार्यकारी समितीचे काही अधिकार महानगर आयुक्तांना देण्यात आले आहेत. ३० नोव्हेंबर २०१८ च्या निर्णयानुसार प्राधिकरणाला अधिकारी, कर्मचारी नियुक्तीबाबत शासनाने मंजुरी दिली आहे. प्राधिकरणातील विकास परवानगी सुरू करणे, तसेच कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यानुसार प्राधिकरणास सुरुवात होत आहे. प्राधिकरणाचे कामकाज सुरू झाल्यामुळे एएमआरडीए क्षेत्रातील बांधकाम, विकास परवानगीच्या प्रलंबित संचिका यादीसह सादर कराव्यात. १५ आॅगस्ट नंतर नव्याने संचिका दाखल करून न घेता, अर्जदारांना कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल करण्यास सांगावे. 
 
प्राधिकरणाची हद्द असेल अशी.... 
एएमआरडीएची हद्द मनपा, खुलताबाद नगरपालिका, छावणी परिषद, औरंगाबाद तालुका भागश:, गंगापूर तालुका भागश:, पैठण तालुका भागश:, फुलंब्री तालुका भागश:, खुलताबाद तालुका भागश: मिळून तयार होईल. 
- पूर्वेला औरंगाबाद तालुक्यातील लामकाना गावची उत्तर, पूर्व सीमा, गेवराई खुबरी, बनेगाव, जयपूर, करमाड, मंगरूळ, महंमदपूर, एकलहरा, पिंपरी बुद्रुकची सीमा, अंबिकापूरची पूर्व व दक्षिण सीमा तर शहापूर, पिंपळगाव पांढरीची पूर्व सीमा. 
- पश्चिमेला गंगापूर तालुक्यातील राजारा, मलकापूर, बोरगाव पश्चिम सीमा, देरडा गावची पश्चिम उत्तर, गोविंदपूर, रांजणगाव पोळ, एकदुरडी, वाघळगावची पश्चिम सीमा, शहनवाजपूरची पश्चिमोत्तर सीमा, पोटूळ, टाकळीवाडीची पश्चिम तर पाचपीरवाडीची पश्चिम व दक्षिण सीमा, देवळी गावची पश्चिम, खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा, वेरूळच्या पश्चिम सीमेचा समावेश आहे. 
- दक्षिण बाजूला औरंगाबाद तालुक्यातील पांढरी गावची पूर्व-दक्षिण सीमा, काद्राबाद दक्षिण सीमा, बेंबळवाडी, जोडवाडी, कचनेर तांडा, पैठण तालुक्यातील पोरगाव, गाजीपूर, नांदलगाव, कौडगाव, सोमपुरी, गिधाडा, शेकटा, रांजणी, रांजणगाव खुरी, गंगापूरमधील धामोरी बुद्रुक, अंतापूर, चांडिकपूर, टेंभापुरी, रहीमपूर, सुलतानपूर गावांच्या सीमांचा विचार केला आहे. 
- उत्तरेला खुलताबादमधील म्हैसमाळ, लामणगाव, ममनापूर, विरमगाव, माटरगाव, महमंदपूर, वडोद खुर्द, येसगाव तर फुलंब्रीतील जानेफळ, वानेगाव बु., वानेगाव खु., पिंपळगाव देव, म्हसाळा, फुलंब्री, दरेगाव, धामणगाव, वाघोळा, डोणवाडा, बोरवाडी, आडगाव सरकळा गावाच्या सीमांचा विचार केला आहे. 

गावांचा विकास आराखडा होणार 
पीएमआरडीए, एमएमआरडीएच्या धर्तीवर एएमआरडीएची स्थापना करण्यात आली आहे. बांधकाम परवानगी आणि एनएला मंजुरी देणे हे प्राधिकरणाचे एक काम आहे. प्राधिकरणाला मुळात ३१३ गावांसाठी विकास आराखडा करण्याचे मोठे काम करावे लागणार आहे. मनपाप्रमाणे वेगवेगळे विभाग प्राधिकरण कार्यालयात असतील. बांधकाम विभाग, पाटबंधारे, महावितरण, कृषी विभागही असेल. आजवर या गावांवर जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियंत्रण होते. १६ आॅगस्टपासून  प्राधिकरण ही सर्व कामे पाहील. जिल्हा नगररचना विभागाडे ३१३ गावे वगळून परवानगीचे अधिकार असतील. नगररचना विभागाचे कर्मचारी प्रतिनियुक्तीवर देण्यात आले आहेत.

Web Title: N-A permitting authority of the Collector's office terminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.