ना‘‘राज’’ नेमाने महापालिकेला अलविदा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:05 AM2021-02-09T04:05:21+5:302021-02-09T04:05:21+5:30
औरंगाबाद : महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर प्रतिनियुक्तीने शासनाकडून आलेले बी. बी. नेमाने प्रचंड नाराज आहेत. त्यांनी आपल्याला कार्यमुक्त ...
औरंगाबाद : महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर प्रतिनियुक्तीने शासनाकडून आलेले बी. बी. नेमाने प्रचंड नाराज आहेत. त्यांनी आपल्याला कार्यमुक्त करावे, अशी विनंती एका अर्जाद्वारे प्रशासनाकडे केली आहे. त्यांच्या नाराजीमागे महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून योग्य सन्मान मिळत नसल्याचे कारण दिसते आहे.
महापालिकेत अधिकाऱ्यांना कामाचा प्रचंड ताण असून, अनेक अधिकाऱ्यांकडे तर तीन-चार विभागांचे पदभार आहेत. त्यामुळे प्रशासनाला शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी मिळावेत, अशी मागणी वारंवार केली जात आहे. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची बदली झाल्यानंतर रिक्त पदावर सहा महिन्यांपूर्वी शासनाने बी. बी. नेमाने यांची बदली केली होती. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी त्यांच्याकडे १० ते १२ विभाग सोपविले आहेत. काही विभागाचे ते थेट प्रमुख आहेत. असे असतानाच त्यांनी आपल्याला कार्यमुक्त करावे, असा अर्ज प्रशासकांकडे केला आहे. सूत्रांनी सांगितले की, प्रशासकांनी प्रत्येक संचिका अतिरिक्त आयुक्तांमार्फत आपल्याकडे सादर करावी, असे आदेश काढले आहेत. मात्र, अनेक संचिका थेट आयुक्तांकडे जातात. सूचना करूनही त्यात फरक पडत नाही. त्यातून त्यांनी कार्यमुक्तीसाठी अर्ज केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. नेमाने यांना प्रशासनाने आर्थिक अधिकार दिलेले नाहीत, फक्त प्रशासकीय अधिकार दिलेले आहेत, अशी वेगवेगळी कारणे यामागे आहेत.
मनपा अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार
महापालिकेत दोन अतिरिक्त आयुक्तपदे आहेत. एका पदावर शासनाकडून आलेले नेमाने तर दुसऱ्या पदावर महापालिकेतील उपायुक्त रवींद्र निकम प्रभारी अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. नेमाने यांना कार्यमुक्त केल्यानंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांना प्रभारी म्हणून पदभार सोपविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.