नाफेडने नाकारले, बाजारभावही पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:58 PM2017-10-24T23:58:04+5:302017-10-24T23:58:13+5:30
मोठा गाजावाजा करुन नाफेडमार्फत धान्य खरेदी केंद्र सुरु केले असलेतरी उत्पादीत धान्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने या केंद्रांवर माल रिजेक्ट केला जात आहे. तर दुसरीकडे ओला माल खरेदीमुळे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेत बाजारात हमीदरापेक्षा कमी भाव मिळत आहे.
अनिल भंडारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मोठा गाजावाजा करुन नाफेडमार्फत धान्य खरेदी केंद्र सुरु केले असलेतरी उत्पादीत धान्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने या केंद्रांवर माल रिजेक्ट केला जात आहे. तर दुसरीकडे ओला माल खरेदीमुळे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेत बाजारात हमीदरापेक्षा कमी भाव मिळत आहे. एकूणच आर्द्रतेच्या कारणांमुळे हमीपेक्षा कमी भाव दिला जात आहे. परतीच्या पावसाचा फटका शेतक-यांना बसला आहे.
शासनाने हमीदराने खरेदी केंद्र सुरु करण्याआधी शेतक-यांना आॅनलाईन नोंदणीची सक्ती केली. दरम्यान या नोंदणीसाठी येणा-या तांत्रिक अडचणींमुळे विलंब लागत आहे. महिनाभरात बीड तालुक्यात १८० शेतकºयांनी नोंदणी केल्याची माहिती सुत्रांनी इतर तालुक्यांमध्ये तर नोंदणीचा आकडा ५० च्या पुढे अद्याप सरकला नाही. जिल्ह्यात उडीद व मुगाच्या खरेदीसाठी बीड, गेवराई, माजलगाव, पाटोदा आणि कडा येथे शासनाचे खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. तर सोयाबीन खरेदीसाठी बीड, गेवराई, माजलगाव आणि कडा येथे केंद्र सुरु केले आहेत. २७ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील अकरा तालुक्यात नाफेडचे खरेदी केंद्र सुरु होतील. सुरु असलेल्या केंद्रांवर नाफेडच्या अटींमुळे शेतकºयांचा माल खरेदीसाठी अपात्र ठरत आहे. खरेदी केंद्रांवर येणा-या मालाची आर्द्रता १२ टक्क्यांपर्यंतच असणे आवश्यक आहे, मात्र त्यापेक्षा जास्त आर्द्रता आढळत आहे.