३, ७ अन १६ मतांनी गमवल्या ३ जागा; शिवसेनेची अटीतटीच्या लढतीत भाजपवर सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 07:05 PM2022-01-20T19:05:19+5:302022-01-20T19:06:31+5:30
Nagar Panchayat Election Result 2022: एकूण २९ मते कमी पडली आणि भाजपने गमाविल्या तीन जागा
सोयगाव : नगरपंचायतीच्या निवडणुकीत (Nagar Panchayat Election Result 2022) अवघ्या २९ मतांनी भाजपकडून ( BJP ) तीन जागा गमावल्या असून, काही मतांच्या फरकाने शिवसेनेने ( Shiv Sena ) विजय मिळवून भाजपला पराभवाचे खडे चारले आहेत. त्यामुळेच शिवसेनेला बहुमताचा आकडा पार करता आला आहे.
नगरपंचायत निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात झालेल्या वार्ड क्रमांक दोनमध्ये भाजपचे प्रमोद पाटील यांना १९३, तर शिवसेनेचे अक्षय काळे यांना १९९ मते पडल्याने काळे अवघ्या तीन मतांनी विजयी झाले. वार्ड क्रमांक सहामध्ये भाजपच्या संगीता मनगटे यांचाही अवघ्या सात मतांनी पराभव झाला असून, येथे शिवसेनेच्या संध्या मापारी यांनी विजयश्री खेचून आणली. प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेच्या सुरेखाबाई काळे यांचा १६ मतांनी विजय झालेला असून, भाजपचे विनोद मिसाळ यांना १२४ मते पडली. या तीनही प्रभागांत भाजपला २९ मतांनी तिन्ही जागा गमवाव्या लागल्या, तर प्रभाग क्रमांक १५ मध्ये झालेल्या काट्याच्या लढतीत शिवसेनेच्या परवीन बानो शहा यांचा केवळ तीन मतांनी पराभव झाला. भाजपच्या सुलताना देशमुख यांना २०३ मते पडली. सतरा उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळवून शिवसेनेच्या शाहिस्ताबी रऊफ (२९७), कुसूम राजू दुतोंडे (२१०) आणि भाजपच्या सुलतानाबी रऊफ (२०३) यांनी विजय मिळविला आहे.
नगरपंचायत सभागृहात दहा महिला ---
नगरपंचायत सभागृहात शिवसेनेच्या पाच, तर भाजपच्या पाच अशा दहा महिला शहराचे प्रतिनिधित्व करणार असून, भाजप विजयी सहा उमेदवारांमध्ये पाच महिला उमेदवारच आहेत. त्यामुळे नगरपंचायतीचे सभागृहात केवळ सात पुरुष असणार आहे.
काँग्रेसला केवळ १९३ मते
दोन्ही टप्प्यांत झालेल्या १७ प्रभागासाठीच्या निवडणुकीत शहरातील पाच हजार २०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये शिवसेनेच्या पारड्यात २ हजार ६२३, तर भाजपला २ हजार ६३ मतदान झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या खात्यात मात्र शहरातील ४२३ मतदारांनी कौल दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात २३०, तर काँग्रेसला १९३ मते मिळाली आहेत.