नागराज, निवृत्ता यांनी जिंकली औरंगाबाद महामॅरेथॉन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 04:58 AM2019-12-16T04:58:47+5:302019-12-16T04:58:56+5:30
महामॅरेथॉन ठरली औरंगाबादकरांना पर्वणी
औरंगाबाद : अंगाला झोंबणाऱ्या गारव्यावर मात करणारा तुतारीचा निनाद, ढोल-ताशांचा उत्साही गजर, आकाशाला क्षणात विविधरंगांनी व्यापणारी आतषबाजी, पाच वर्षांच्या नातवापासून पंचाहत्तरी पार केलेल्या आजी-आजोबांचा गगनाला गवसणी घालणारा आत्मविश्वास, तरुण-तरुणी, विद्यार्थी, दिव्यांग धावपटूंच्या उत्स्फूर्त सहभागाला औरंगाबादकर नागरिकांनी पुष्पवृष्टी करून दिलेला अपूर्व नजराणा, त्याच तोलामोलाचे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्पर्श झालेले भव्यदिव्य नियोजन. उमद्या व उत्साहवर्धक वातावरणात रविवारी विभागीय क्रीडा संकुलात पार पडलेली लोकमत समूह आयोजित खुल्या गटातील २१ कि. मी. औरंगाबाद महामॅरेथॉन नागपूरचा नागराज खुरासने आणि नाशिकची निवृत्ता दाहवाड यांनी जिंकली. नागराजने पुरुष गटात २१ कि.मी.चे अंतर १ तास ११ मि. १९ सेकंदांत पूर्ण केले. महिलांच्या गटात निवृत्ता दाहवाड हिने वर्चस्व राखताना १ तास ३८ मि. ३ सेकंदात अव्वल स्थानावर कब्जा केला. परदेशी गटात बेरेकेट बेले याने २१ कि. मी. अंतर १ तास २५ मि. १९ सेकंदांत पूर्ण करीत विजेतेपद पटकावले.
सुरुवातीला वॉर्मअपनंतर पहाटे ६ वाजता राष्ट्रगीत झाले व ६ वाजून १५ मिनिटांनी २१ कि .मी.च्या खुल्या गटातील धावपटूंना महापौर नंदकुमार घोडेले, लोक मत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, आ. संजय शिरसाट, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, सखी मंचच्या संस्थापिका आशू दर्डा, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंदर सिंगल, कमिशनर सेंट्रल जीएसटी आर. व्ही. सिंग, युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर उन्मेष टाकळकर, स्टरलाईट टेक्नॉलॉजिस लिमिटेडचे आदित्यसिंग यांनी ‘फ्लॅग आॅफ’ केला व धावपटू वेगाने आपल्या ध्येयाकडे झेपावले.
च्हैदराबादचा दिव्यांग रनर शेखर गौड आणि ब्लेड रनर प्रसन्नकुमार अलिगा हे रविवारी झालेल्या लोकमत महामॅरेथॉनचे विशेष आकर्षण ठरले. या दोघांसोबत सेल्फी काढण्यासाठी सहभागी झालेला प्रत्येक जण उत्सुक होता. या दोघांनीही आपले निर्धारित अंतर यशस्वीपणे पूर्ण करताना उपस्थितांची मने जिंकली.
च्विठाबाई कच्छवे व भगवान कच्छवे या दोघांनी सलग दुसऱ्यांदा सर्किट रनच्या दिशेने पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे ते लोकमत महामॅरेथॉनमध्ये सलग १३ व्यांदा धावले आहे. तसेच २०१७ मध्ये दोघांनी औरंगाबाद, कोल्हापूर व नागपूर व पुणे येथे सहभाग नोंदवला. तथापि, गत हंगामात त्यांनी नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर व पुणे येथे धावत सर्किट रन पूर्ण केले. यंदा नाशिक व औरंगाबादमध्ये सहभागी होताना त्यांनी सलग दुसºयांदा सर्किट रनच्या दिशेने मार्गक्रमण केले. विठाबाई यांनी आज १० कि. मी. ज्येष्ठ महिला गटात दुसरे स्थान मिळले. याआधीही त्यांनी लोकमत महामॅरेथॉनअंतर्गत नागपूर, नाशिक येथे पदकविजेती कामगिरी केली आहे.
च् खाणकाम करणाºया कुटुंबातील नंदिनी पवार व उदगीरच्या पूजा श्रीडोळे यांनीही आपला ठसा उमटवला. पूजा श्रीडोळे हिने गतवर्षी औरंगाबाद येथे दुसरा क्रमांक पटकावला. यंदा मात्र, तिने विजेतेपद पटकावत कामगिरी उंचावली.
च्जीम ट्रेनर म्हणून नोकरी करणाºया नाशिकच्या निवृत्ता दाहवाड हिने विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली. तिने गतवर्षी आणि यंदा नाशिक येथे अव्वल स्थान पटकावले आणि रविवारी औरंगाबाद येथेही २१ कि. मी. महामॅरेथॉन जिंकली.
च्गतवर्षीप्रमाणेच दिनकर शेळके यांनी अनवाणी धावताना उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ६६ वर्षीय माधव केदार यांनी औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये सलग चौथ्यांदा सहभाग नोंदवताना अनोखा चौकार मारला.
च्कर्करोगावर मात करणारा जिगरबाज धावपटू पराग लिगदे आज महामॅरेथॉनमध्ये आपल्या आई वैशाली व वडिल श्रीनिवास यांच्यासह धावला.
जिगरबाज शेखरला करायचे एव्हरेस्ट सर
हैदराबादचा दिव्यांग रनर शेखर गौड हा लोकमत महामॅरेथॉनमध्ये रविवारी १0 कि. मी. अंतर धावला. गौड याने २0२४ मध्ये जगातील सर्वात उंचीवर असणारे एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे आपले लक्ष्य असल्याचे सांगितले. मन आणि हृदय स्थिर असले तर अशक्य असलेले ध्येयही पूर्ण करू शकतो, असे त्याने सांगितले. शेखर गौड याला वयाच्या १८ व्या वर्षी अपघात झाला.
अलिगाला जगभर बाईकवर फिरायचे
महामॅरेथॉनमध्ये २१ कि. मी. धावणारा हैदराबादचा ब्लेड रनर अलिगा प्रसन्नकुमार याने आपल्याला बाईकवर जगभर फिरायचे आहे. ही महाराष्ट्रातील आपली पहिलीच मॅरेथॉन आहे. प्रतिकूल वातावरणातही काही करून दाखवण्याची आपली जिद्द असून, प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेत असल्याचे ब्लेड रनर अलिगा प्रसन्नकुमार म्हणाला.