मराठवाड्याला पाणी देण्यास नगरच्या शेतकऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 03:17 PM2018-10-15T15:17:59+5:302018-10-15T15:19:26+5:30
समन्यायी पाणी वाटपाबाबत बैठक सुरु असून दुपारपर्यंत याबाबत काही निर्णय झाला नाही.
औरंगाबाद : नगरच्या शेतकऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयात येत जायकवाडी धरणात नगर जिल्ह्यातून पाणी सोडण्यास विरोध केला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळात सध्या समन्यायी पाणी वाटपाबाबत बैठक सुरु असून दुपारपर्यंत याबाबत काही निर्णय झाला नाही.
अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडीला सोडण्याबाबत आज गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळात बैठक सुरु आहे. या बैठकीत समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार वरच्या धरणातून सुमारे १२ टीएमसी पाणी जायकवाडीला देण्याचा निर्णय होणार आहे. आज दुपारी बैठका सुरु असताना नगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मंडळाच्या कार्यालयात येत हे पाणी वाटप समन्यायी नसून असमन्यायी असल्याचा आरोप करत पाणी वाटपाला विरोध केला.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी संचालकांना त्यांनी या संदर्भात एक निवेदन दिले आहे. निवेदनात २०१२ पासून पाणी वाटप कायद्याद्वारे नगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणी नेले जाते हे अन्यायकारक आहे, जायकवाडी धरणाची क्षमता महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश राज्यातील वादामुळे वाढविण्यात आली आहे, जायकवाडीचे लाभक्षेत्र व ऊर्ध्व धरणांचे लाभ क्षेत्र यांची पीकनिहाय गरज व पर्जन्यमान विचारात घेतले नाही. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात ११ उच्चस्तरीय बंधारे बांधण्यात आली आहेत, ही बंधारे शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवत आहेत आदी कारणे नमूद करत आंदोलक शेतकऱ्यांनी वरच्या धरणातून पाणी सोडण्यास विरोध केला.
दरम्यान, मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधीने दुष्काळी परिस्थिती पाहता समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार पाणी सोडण्याची मागणी केली आहे. यामुळे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळात बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज दुपारपर्यंत या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नव्हता.