‘आयी आयी चेन्नई एक्स्प्रेस आयी’; दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा धावणार 'चेन्नई-नगरसोल' रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 06:49 PM2022-06-22T18:49:55+5:302022-06-22T18:52:06+5:30
अखेर दक्षिण मध्य रेल्वेने ही एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
औरंगाबाद : चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटातील ‘टिकट खरीद के, बैठा जा सीट पे, निकल ना जाए कहीं चेन्नई एक्सप्रेस, चेन्नई आयी आयी आयी आयी चेन्नई एक्सप्रेस...’ हे गीत रेल्वे प्रवाशांना खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा म्हणता येणार आहे. कोरोना विळख्यात गेल्या २ वर्षांपासून बंद असलेली नगरसोल-चेन्नई-नगरसोल साप्ताहिक एक्स्प्रेस २६ जूनपासून पुन्हा एकदा धावणार आहे.
दोन वर्षांपासून ही एक्स्प्रेस सुरू होण्याची प्रतीक्षा होती. अखेर दक्षिण मध्य रेल्वेने ही एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या रेल्वेला द्वितीय श्रेणी वातानुकूलित, तृतीय श्रेणी वातानुकूलित, स्लीपर क्लास आणि जनरल अशा एकूण २३ बोगी राहणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शहराची रेल्वेची चेन्नईची कनेक्टिव्हिटी तुटली होती. परंतु, ही कनेक्टिव्हिटी पुन्हा मिळणार आहे.
असे आहे रेल्वेचे वेळापत्रक
चेन्नई सेंट्रल ते नगरसोल ही रेल्वे २६ जूनपासून दर रविवारी सकाळी ९.१० वाजता चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरून सुटेल. रेणीगुंठा, कर्नूल, काचीगुडा, निजामाबाद, नांदेडमार्गे ही रेल्वे औरंगाबादेत दुसऱ्या दिवशी, सोमवारी सकाळी ९.५५ वाजता दाखल होईल आणि १० वाजता पुढे रवाना होईल. दुपारी ११.५५ वाजता नगरसोल येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात नगरसोल ते चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस २७ जूनपासून दर सोमवारी दुपारी १.३० वाजता नगरसोल रेल्वे स्टेशनवरून सुटेल आणि औरंगाबादला दुपारी २.४५ वाजता पोहोचेल. ५ मिनिटांच्या थांब्यानंतर ही रेल्वे पुढे रवाना होईल. नांदेड, निजामाबाद, काचीगुडा, कर्नुल, रेणीगुंठामार्गे चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता ही रेल्वे पोहोचेल.