आंबेडकर जयंतीनिमित्त मिलिंद परिसरात ‘नागसेन फेस्टिव्हल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 05:07 PM2018-03-22T17:07:58+5:302018-03-22T17:08:53+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या नागसेनवनात आजी-माजी विद्यार्थ्यांतर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त ‘नागसेन फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे.
औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या नागसेनवनात आजी-माजी विद्यार्थ्यांतर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त ‘नागसेन फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. या फेस्टिव्हलमध्ये नागसेनवनातील माजी विद्यार्थी प्रतापसिंग बोदडे यांना ‘नागसेन गौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक सचिन निकम यांनी दिली.
दोन वर्षांपासून नागसेन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी हा फेस्टिव्हल ३०, ३१ मार्च, १ एप्रिल आणि ११ एप्रिल रोजी नागसेनवनातील लुम्बिनी उद्यानात सायंकाळी साडेपाच ते १० वाजेपर्यंत आयोजित केला आहे. या फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे समाजप्रबोधनाचे कार्यक्रम, व्याख्यान, विविध स्पर्धा, नाट्य, एकांकिकाचे आयोजन केले आहे.या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सचिन निकम, अविनाश कांबळे, सिद्धार्थ मोकळे, मेघानंद जाधव, प्रा. किशोर वाघ, अरुण शिरसाठ, अतुल कांबळे, आनंद सूर्यवंशी, कुणाल भालेराव, चिरंजीव मनवर, विवेक सोनवणे, विशाल देहाडे आदींनी केले आहे.
विविध क्षेत्रात ठसा उमटविलेल्यांचा सत्कार
नागसेनवनात शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात ठसा उमटविलेल्या माजी विद्यार्थ्याला ‘नागसेन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित केले जाते. यावर्षी हा पुरस्कार वामनदादा कर्डक यांचे शिष्य व मिलिंद कला महाविद्यालयाच्या १९६८ च्या बॅचचे विद्यार्थी प्रतापसिंग बोदडे यांना प्रदान केला जाणार आहे. बोदडे यांनी नागसेनवनातूनच बी. ए., एम. ए. चे शिक्षण घेत रेल्वे विभागात आपली छाप पाडली. याशिवाय नोकरीत असतानाही आंबेडकरी चळवळीसाठी भीमगीत, गजल, कवितांचे लिखाण केले आहे. याची दखल घेत त्यांना १ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित कार्यक्रमात सन्मानित केले जाणार असल्याचे सचिन निकम यांनी सांगितले.