नाल्यांची २० वर्षांपासून एकच बोंब!

By Admin | Published: May 4, 2016 01:16 AM2016-05-04T01:16:48+5:302016-05-04T01:26:39+5:30

औरंगाबाद : दरवर्षी मान्सूनच्या तोंडावर महापालिकेत नाल्यांचा प्रश्न अचानक गंभीर बनतो. अधिकारीही अत्यंत गांभीर्याने आम्ही

Nalas have been for one year only! | नाल्यांची २० वर्षांपासून एकच बोंब!

नाल्यांची २० वर्षांपासून एकच बोंब!

googlenewsNext


औरंगाबाद : दरवर्षी मान्सूनच्या तोंडावर महापालिकेत नाल्यांचा प्रश्न अचानक गंभीर बनतो. अधिकारीही अत्यंत गांभीर्याने आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटअंतर्गत कशा पद्धतीने तयारी केली. सखल भागात पाणी शिरणार नाही, याची कशी काळजी घेतली याची माहिती देतात. अधिकारी व पदाधिकारी मिळून शहरातील नाल्यांची पाहणी करतात. वर्तमानपत्रात नाले पाहणीचे फोटो छापून येतात. पावसाळा संपल्यावर नाल्याचा प्रश्न जशास तसाच असतो.
मागील २० वर्षांपासून आम्ही हे नाट्य पाहत आहोत. बंद करा हा पोरखेळ, प्रशासनाने ठोस असा कार्यक्रम हाती घ्यावा, अशा शब्दांत मनपा पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
मंगळवारी महापौर त्र्यंबक तुपे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभागृहात मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ, काळजीवाहू सभापती दिलीप थोरात, सभापती स्मिता घोगरे, भारती सोनवणे, नितीन साळवी, बबिता चावरिया, नगरसेवक गोकुळ मलके, शहर अभियंता एस.डी. पानझडे यांच्यासह वॉर्ड अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नगरसेवकांनी शहरातील प्रमुख नाल्यांवरून प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. दर्शनी भागात साफसफाई करण्यात येते. नाल्यातील गाळ काठावर तसाच ठेवण्यात येतो. पाण्याचा मोठा प्रवाह आल्यावर हा गाळ आपोआप वाहून जातो. नाले सफाईवर दरवर्षी कोट्यवधी रुपये कशासाठी खर्च करायचे. नाल्यातील अतिक्रमणे आजपर्यंत का काढण्यात आली नाहीत. वॉर्ड अधिकारी, इमारत निरीक्षक नाल्यांमध्ये अनधिकृत बांधकामे कशी काय होऊ देतात, अशी एक नाही अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.
शहर अभियंता पानझडे यांनी नमूद केले की, यंदाही मनपातर्फेच नालेसफाई करण्यात येणार आहे. नाल्यातील गाळ काढून टाकायचा कुठे, हा मोठा प्रश्न आहे. सोयीची जागा पाहून हा गाळ तेथे नेऊन टाकण्यात येईल. औषधी भवन येथे परिस्थिती खूपच गंभीर आहे. या इमारतीचा काही भाग तोडून पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळवून द्यावा लागेल. मोठे नाले साफ करताना लहान नाल्यांकडे दुर्लक्ष होते.
यंदा लहान नाले, वॉर्डातील मोठ्या नाल्याही शॉर्ट टेंडर काढून साफ करण्यात येणार आहेत. अग्निशमन विभागाने शहरातील शाळा, मंगल कार्यालये आदींची यादी तयार केली आहे. १ जूनपासून मनपात आपत्कालीन कक्षही उघडण्यात येणार आहे. या उत्तरावर पदाधिकाऱ्यांचे अजिबात समाधान झाले नाही. सर्वसामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेवून काम करा, असे आदेश महापौरांनी दिले.
पावसाळ्यात झाडे पडतात
दरवर्षी वादळी वारा, पाऊस सुरू झाल्यावर शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळतात. मागील वर्षी गरोदर महिलेच्या अंगावर एक झाड पडले होते. शहरातील धोकादायक झाडे शोधून ती त्वरित काढून घ्यावीत. झाडांची तोडणी मनपातर्फे करण्यात येईल. त्याचप्रमाणे उघड्या डी.पीं.मुळे अनेक जण यापूर्वी मरण पावले आहेत. त्यामुळे मनपाच्या पथदिव्यांचीही पाहणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकातर्फे सध्या सुपारी घेऊन काम सुरू आहे. तक्रार दिल्यानंतर सहा-सहा महिने कारवाई होत नाही. मागील २० वर्षांमध्ये मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाला नाल्यांमधील अतिक्रमणे दिसली नाहीत का, असा प्रश्न राजेंद्र जंजाळ यांनी उपस्थित केला. औषधी भवनचा प्रश्न, नाल्यांमध्ये ड्रेनेजलाईन टाकणे अवघड आहे, मग अतिक्रमण हटाव पथक काय काम करते. नाला रुंदीकरण मोहीम आजपर्यंत का हाती घेण्यात आली नाही. यापुढे दोषींवर कारवाई न झाल्यास आपण स्वत:हून फौजदारी कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Nalas have been for one year only!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.