बजाजनगरात अखेर नालेसफाईला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:04 AM2021-05-29T04:04:06+5:302021-05-29T04:04:06+5:30
वाळूज महानगर : पावसाळा तोंडावर येऊनही एमआयडीसीला नालेसफाईचा विसर पडल्याने नागरी वसाहतीत नाल्याचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाल्याचे वृत्त ...
वाळूज महानगर : पावसाळा तोंडावर येऊनही एमआयडीसीला नालेसफाईचा विसर पडल्याने नागरी वसाहतीत नाल्याचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतने शुक्रवारच्या अंकात सविस्तर प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत एमआयडीसीने शुक्रवारी बजाजनगरात नालेसफाईचे काम हाती घेतले आहे.
एमआयडीसीकडून पावसाळ्यात नाल्याचे पाणी नागरी वसाहत तसेच औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यात शिरू नये, यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम करण्यात येते. यंदा, मात्र मे महिना संपत आल्यानंतरही एमआयडीसीने बजाजनगर व परिसरात नालेसफाईचे काम सुरू न केल्याने पावसाळ्यात नागरी वसाहतीत पाणी शिरण्याची भीती वर्तविली जात आहे. या संदर्भात लोकमतने बजाजनगरातील नालेसफाईचा एमआयडीसीला विसर अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता व्ही. बी. मुळे, उपअभियंता दीपके यांनी शुक्रवारपासून बजाजनगरात नालेसफाईचे काम हाती घेतले आहे. या मोहिमेत बीएसएनएल गोडावून ते चिंचबन कॉलनी, आम्रपाली बुद्ध विहार ते मुख्य रस्ता, म्हाडा कॉलनी ते स्टरलाइट कंपनी, बजाज विहार परिसर आदी ठिकाणावरून वाहणाऱ्या नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. लोकमतच्या वृत्तानंतर एमआयडीसी प्रशासनाला जाग येऊन नालेसफाईचे काम हाती घेतल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
फोटो ओळ
बजाजनगरात एमआयडीसीने नालेसफाईचे काम सुरू केले असून, जेसीबीच्या साहाय्याने नाल्यातील केरकचरा काढून नाल्याचा प्रवाह मोकळा केला जात आहे.