नाले सफाईच्या कामाची महापालिकेकडून उलटतपासणी; दर्जाबाबत अभिप्राय देण्याचे नागरिकांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 06:40 PM2021-03-24T18:40:49+5:302021-03-24T18:45:43+5:30
Aurangabad Municipal Corporation नालेसफाईची कामे गतवर्षी मे महिन्याच्या शेवटी व जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आली होती.
औरंगाबाद : महापालिकेने मागील वर्षी पावसाळ्यात नालेसफाईवर तब्बल १ कोटी ५१ लाख ७ हजार ३२६ रुपये खर्च केले. कंत्राटदारांनी नालेसफाईच्या कामांची बिले प्रशासनाला सादर केली. बिल अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिकेचे प्रशासक यांनी विविध नाले व एकत्रित बिलांची यादी जाहीर केली असून, ही कामे समाधानकारक झाली आहेत का? याचा अभिप्राय नागरिकांनी दहा दिवसांच्या आत द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शहरातील नालेसफाईवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. ही कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी संपणे अपेक्षित असते; पण प्रत्येक वर्षी विलंबाने कामे सुरू केली जातात. पावसाच्या पाण्यामुळे नाले स्वच्छ झाले का, कंत्राटदारांनी केले, हे कोणालाही कळत नाही. नाल्यातील दर्शनी भागात गाळ काढून ठेवण्यात येतो. हा गाळ नंतर आपोआप गायब होतो. कंत्राटदाराला गाळ वाहतुकीचा खर्च वाचतो, असा आरोप वारंवार केला जातो.
काही वर्षांपूर्वी शहरातील संपूर्ण नाल्यांच्या सफाईचे एकत्रित कंत्राट दिले जात होते. ही निविदा कोट्यवधी रुपयांची असायची. त्यावर टीका सुरू झाल्यानंतर काही कामे महापालिकेमार्फत तर मोठ्या नाल्यांची कामे कंत्राटदारामार्फत केली जात आहेत. असे असले तरी गतवर्षी १ कोटी ५२ लाख ५७ हजारांचे नऊ प्रभागातील कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. प्रत्यक्षात १ कोटी ५१ लाख ७ हजार ३२६ रुपयांचा खर्च केला. या कामांची बिले कंत्राटदारांनी लेखा विभागाला सादर केली आहेत. प्रशासक यांनी नऊ प्रभागांतील कामे व त्यांची बिले महापालिकेच्या सोशल मीडियाच्या पेजवर टाकली आहेत. त्यात ९६०७९३३५४१ हा क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकावर व्हॅाट्सॲपद्वारे अभिप्राय कळवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सोबत कंत्राटदारांनी बिलाला जोडलेले छायाचित्रेही टाकण्यात आली आहेत.
वर्षभरात नाल्यांमध्ये गाळ, कचरा दिसणारच
नालेसफाईची कामे गतवर्षी मे महिन्याच्या शेवटी व जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आली होती. त्याला दोन महिन्यांनी वर्ष होणार आहे. त्यामुळे नागरिकांना गतवर्षी झालेल्या कामांची आठवण राहणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या शहरातील सर्व नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.