नमन.. जगत्ज्योतींना...
By Admin | Published: April 29, 2017 12:40 AM2017-04-29T00:40:00+5:302017-04-29T00:42:40+5:30
लातूर : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती मोठ्या उत्साहात शुक्रवारी साजरी करण्यात आली.
लातूर : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती मोठ्या उत्साहात शुक्रवारी साजरी करण्यात आली. कव्हा नाका येथील महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायांनी गर्दी केली होती. प्रारंभी सकाळी मनपाच्या वतीने बसवेश्वर उद्यानातील सिंहासनाधिष्ठित जगत्ज्योतींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. श्री महात्मा बसवेश्वरांच्या जीवनकार्यावरील चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी उद्यानात अनुयायांची गर्दी झाली होती. साठे चौकातील बसवेश्वर मंदिरात जन्मोत्सवाचा पाळणाही घालण्यात आला. ‘वीरशैव कक्कया समाज’ आणि ‘आपण सर्वजण’च्या वतीने शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.लातूर महापालिकेचे आयुक्त रमेश
पवार, महापौर अॅड. दीपक सूळ यांच्या हस्ते व शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीरकर, अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वचनाने पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजेश दरडे, सुनील मिटकरी, महादेव खिचडे, प्रा. सुदर्शन बिराजदार, सारंग लहुरे, अॅड. स्वाती तोडकरी, रामलिंगअप्पा ठेसे, आर.सी. स्वामी, शरणाप्पा अंबुलगे यांना ‘बसवरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
लिंगायत समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक पूजा पंचाक्षरी, प्रा. भाग्यश्री कौळखेरे तसेच चंद्रकांत बिराजदार, संगीत रंदाळे, शैलेश स्वामी, अॅड. दीपक मठपती यांचाही सत्कार करण्यात आला. सायंकाळी महात्मा बसवण्णा व बसववादी शरण जीवन चरित्र चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन शिवदासअप्पा लखादिवे यांच्या हस्ते करण्यात आले. हे चित्रप्रदर्शन ३० एप्रिलपर्यंत खुले राहणार आहे. त्यानंतर ‘आपण सर्वजण’ आणि वीरशैव कक्कया समाजाच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
सायंकाळी ६ वाजल्यानंतर राजीव गांधी चौक, कामदार रोड, खाडगाव रोड, बसवेश्वर गल्ली, गवळी गल्ली, आझाद चौक, राचट्टे गल्ली, शेटे गल्ली आदी भागांतून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. बसवेश्वर महाविद्यालयासमोरील उद्यानात या मिरवणुकांचा समारोप झाला.
साठे चौकातील बसवेश्वर मंदिरात पाळणा घालण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. अशा विविध कार्यक्रमांनी श्री महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करण्यात आली. (प्रतिनिधी)