Namantar Andolan : मराठवाडाभर फिरून आपद्ग्रस्तांना मदत देता आली, याचे समाधान : अंकुश भालेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 05:02 PM2019-01-12T17:02:12+5:302019-01-12T17:02:50+5:30
लढा नामविस्ताराचा : पूर्वी सामंजस्य होते. एकमेकांप्रती माणुसकी होती; पण हळूहळू दुरावा वाढत गेला. काही नेत्यांच्या भाषणांमुळे हा दुरावा वाढत गेला.
- स. सो. खंडाळकर
आपद्ग्रस्त दलित साहाय्य समिती स्थापन करून आम्ही त्यावेळी मराठवाडाभर फिरलो. या समितीचे अध्यक्ष बॅ. जवाहर गांधी होते. दिवंगत बापूसाहेब काळदाते व आम्ही असे सारे जण नामांतर प्रश्नावरून जिथे जिथे दंगली उसळल्या होत्या, त्या भागात म्हणजे सुगाव, जळकोट आदी भागांत पोहोचून आपद्ग्रस्त दलित बांधवांना गरजू वस्तू उपलब्ध करून देऊ शकलो, याचे एक समाधान वाटते; पण त्याचवेळी दलित समाजबांधवांची ती दैना पाहून माझे तर डोळे भरून येत असत. रडू कोसळत असे. इथेच माझ्यातील मानवतावाद जागा होत गेला आणि मी दिवसेंदिवस टप्प्याटप्प्याने नामांतरवादी बनत गेलो, असे तत्कालीन नामांतरवादी विद्यार्थी नागरिक कृती समितीचे अध्यक्ष अॅड. अंकुश भालेकर यांनी सांगितले.
नामविस्तार दिनाच्या रौप्य महोत्सवानिमित्त ते लोकमतशी बोलत होते. अॅड. अंकुश भालेकर हे मूळचे जालना जिल्ह्यातील अंबडचे. मुंबईत त्यांनी जर्नालिझमचा अभ्यास पूर्ण करून तिथल्या नामांकित इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी त्याकाळी पत्रकारिता केली. पुढे ते औरंगाबादला आले. वकिली सुरू केली. औरंगाबादच्या समाजवाद्यांच्या वर्तुळात त्यांची ऊठबस. ‘इगो आणि श्रेयाच्या भांडणात ही समाजवादी मंडळी नामांतरविरोधी बनली. मूलत: ही मंडळी दलितविरोधी नव्हती, असे मत भालेकर यांनी मांडले.
वडीलबंधूंनी केलेल्या समतेच्या संस्कारातून मी घडत गेलो. म. भि. चिटणीस हे नामांतरवादी कृती समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढे ही जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. ६ डिसेंबर १९७९ रोजी क्रांतीचौकात गनिमी काव्याने जो सत्याग्रह झाला. त्यात मी, प्रकाश सिरसाट आणि दिवंगत भीमराव जाधव कार्यरत होतो. बाहेर गावाहून आलेल्या कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था आम्ही करीत होतो, अशी आठवण सांगत अॅड. भालेकर म्हणाले, बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना आम्ही मुंबईत सत्याग्रह केला. आम्हाला ठाण्याच्या कारागृहात ठेवण्यात आले.
यात डॉ. बाबा आढाव, दिवंगत कॉ. शरद पाटील, दिवंगत नरेंद्र दाभोळकर यासारखी मंडळी होती. कारागृहातच बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आमचे उपोषण सुरू झाले. बाबांना दवाखान्यात भरती करावे लागले. मी चौदा दिवसांपर्यंत उपोषण केले होते. ते संपल्यानंतर एस.एम. जोशी यांच्याकडे दोन दिवस थांबलो. औरंगाबादला परत आलो, तर माझे स्वागत झाले.
दुसऱ्या दिवशी चक्क अनंत भालेराव भेटीला आलेले. ते जात नाहीत तर काँग्रेसचे नेते दिवंगत बाळासाहेब पवार भेटायला आलेले. आम्ही ठाण्याच्या कारागृहात उपोषण सुरू केल्यानंतर पाठिंबा म्हणून औरंगाबादला भडकलगेटला उपोषण करण्यात आले होते. त्यात माझी पत्नी नंदा भालेकरही सहभागी झाली होती.
इगो आणि श्रेयाच्या भांडणातूनच नामांतराचा लढा लांबत गेला. शरद पवार नामांतरवादीच होते. शेवटी ते मुख्यमंत्री असताना ते झाले. मोहन देशमुख वगैरे ही मंडळी आधी नामांतरवादीच होती. पूर्वी सामंजस्य होते. एकमेकांप्रती माणुसकी होती; पण हळूहळू दुरावा वाढत गेला. काही नेत्यांच्या भाषणांमुळे हा दुरावा वाढत गेला, असे त्यांनी सांगितले.