Namantar Andolan : नामांतरविरोधी असूनही गोविंदभाई म्हणाले, तू तुझ्या भूमिकेवर ठाम राहा : श्रीराम जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:09 PM2019-01-16T12:09:27+5:302019-01-16T12:10:24+5:30
लढा नामविस्ताराचा : मी नाशिकच्या जेलमधून बाहेर पडून औरंगाबादला आलो आणि आणखी एका केसमध्ये मला हर्सूलमध्ये दहा दिवस राहावं लागलं. अमीर हबीब आणि मला ही शिक्षा तत्कालीन जजने सुनावली होती.
- स. सो. खंडाळकर
मी त्यावेळी नामांतरविरोधी असलेल्या स.भु. शिक्षण संस्थेत कारकून म्हणून काम करीत होतो. नुकताच माझा आंतरजातीय विवाह झाला होता. आम्ही जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीत काम करीत होतो. नामांतरासाठी ६ डिसेंबर १९७९ रोजी क्रांतीचौकातील सत्याग्रहात आम्ही उभयता भाग घेतला. अटक होऊन मला नाशिकच्या जेलमध्ये आणि माझ्या पत्नीला हर्सूल जेलमध्ये ठेवले. पुढे बाहेर आल्यावर मी कामावर रुजू झालो; पण नामांतर लढ्यात सहभाग घेतला हा जणू गुन्हाच ठरू लागला. कार्यालयातील अन्य सहकारी माझा राग करू लागले. मला त्रास देऊ लागले. तू इथं कसा राहतोस ते पाहू, असे धमकावू लागले. मग मी स.भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोविंदभाई श्रॉफ यांना भेटलो आणि घडत असलेला सारा प्रकार त्यांच्या कानी घातला. शांतपणे त्यांनी तो ऐकला अन् मला म्हणाले, भारतीय संविधानानुसार तू तुझं जे असेल ते मत जोपासू शकतो आणि मी माझं मत जोपासू शकतो. काळजी करू नको. जा आणि तू तुझं काम कर.’
हा किस्सा सांगितला प्रा. श्रीराम जाधव यांनी. नामविस्तार दिनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ते ‘लोकमत’शी बोलत होते. प्रा. श्रीराम जाधव हे गांधीवादी, तेवढेच पुरोगामी मतांचे. नुकतेच ते पवनारला पाच वर्षे राहून आले आहेत आणि पुन्हा सामाजिक कार्याला वाहून घेतले आहे. बारा वर्षे स.भु.मध्ये कारकून म्हणून नोकरी केल्यानंतर प्रा. जाधव यांनी एम.ए., एम.फिल. करून परभणीला दोन वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. १९९२ पर्यंत ते देवगिरी महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक होते. सेवानिवृत्ती घेऊन ते पवनार आश्रमात गेले. लग्न झाल्यानंतर हनीमूनसाठी कुठेतरी बाहेर जाण्याचे ते दिवस; पण आम्ही नामांतर लढ्यात उडी घेऊन कारावास भोगला. गोविंदभाई नामांतर विरोधी होते; तरी त्यांनी स.भु.मधील नामांतरवाद्यांना कधीच रोखले नाही. त्यासंदर्भात माझं उदाहरण पुरेसं बोलकं आहे. याकडे प्रा. जाधव यांनी लक्ष वेधले. नंतर मग नामांतर होईपर्यंत माझा त्यात सहभाग राहिला. नामांतर झालं, पुढं काय, हा प्रश्न आहेच. विद्यापीठ त्या गतीनं प्रगतिपथावर असायला हवं, असे ते म्हणाले.