Namantar Andolan : मराठवाड्याची माणुसकी हरवलेला ‘तो पंधरवडा’...
By शांतीलाल गायकवाड | Published: January 14, 2019 12:55 PM2019-01-14T12:55:55+5:302019-01-14T13:01:37+5:30
२८ जुलै ते ११ ऑगस्ट या काळात जवळपास २५ हजारांहून अधिक दलितांना यात मार खावा लागला. लाखो रुपयांची त्यांची मालमत्ता लुटण्यात आली किंवा पेटवून देण्यात आली. उभ्या पिकात सवर्णांनी जनावरे सोडून दलितांच्या भविष्याचीही कोंडी केली.
विद्यापीठ नामांतर आंदोलनाची वाढणारी व्याप्ती व तीव्रता लक्षात घेऊन राज्य सरकारने २७ जुलै १९७८ रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाने नामांतराचा प्रस्ताव एकमताने समंत करून मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देण्याचा एकमुखी निर्णय घेतला. या निर्णयाचे हिंसक पडसाद तात्काळ मराठवाड्यात उमटले. नामांतर विरोधकांची जातीय भावना टोकाची तीव्र झाली. दलित वसाहतींवर सामूहिक हल्ले सुरू झाले. दलितांच्या वसाहती पेटवून देण्यात आल्या. जाळपोळ, लुटालुट सुरू झाली. नामांतराच्या घोषणेनंतर केवळ आठवडाभरात १४ दलितांना ठार मारण्यात आले. हजारो दलित जखमी, जायबंदी झाले. हजारोंनी गावे सोडून पलायन केले. २८ जुलै ते ११ ऑगस्ट या काळात जवळपास २५ हजारांहून अधिक दलितांना यात मार खावा लागला. लाखो रुपयांची त्यांची मालमत्ता लुटण्यात आली किंवा पेटवून देण्यात आली. उभ्या पिकात सवर्णांनी जनावरे सोडून दलितांच्या भविष्याचीही कोंडी केली.
१९७७ पासून सुरू झालेला नामांतराचा लढा पुढे १६ वर्षे सातत्याने लढला गेला. त्यात जवळपास २७ जण शहीद झाले. त्यात तरुण होते. तरुणी होत्या. किशोरवयीन मुलेही होती. शिक्षित, अशिक्षित महिला, पुरुष होते. पोलीस अधिकारी, कर्मचारीही होते. या लढ्यात सवर्ण गावकऱ्यांच्या हल्ल्यात १४ जण मारले गेले. तर उर्वरितांनी नामांतरासाठी आत्मबलिदानाचा मार्ग पत्करला. पोलिसी अत्याचार व गोळीबारात ५ जण ठार झाले. सरकारी अहवाल सांगतो या पंधरवड्यात मराठवाड्यातील १२४ दलित वसाहतींवर झालेल्या संघटित हल्ल्यात १०६५ झोपड्या, घरे जाळण्यात आली. त्यात ६३७० व्यक्ती बाधित झाल्या. अर्थात या आकडेवारीच्या कैकपटीने ही दंगल मोठी होती व त्यात झालेले नुकसानही मोठे आहे.
पोचिराम कांबळे पहिला नामांतर बळी
टेंभुर्णी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील पोचिराम मरिबा कांबळे हे ग्रामपंचायत सदस्य होते. पंचक्रोशीतील आठ, दहा गावच्या सवर्णांनी एकत्र येऊन पोचिराम कांबळे याला जिवंत जाळले. संपूर्ण दलित वसाहतीचीही राखरांगोळी केली. महिलांना मारहाण झाली. मुले, मुलीही हल्ल्यातून सुटल्या नाहीत. पुढे पोचिरामचा मुलगा चंदर कांबळे यांनी आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला म्हणून गावातील वडिलांचा मारेकरी शेषराव वडजे यांचा खून केला. १९८३ मध्ये गावकऱ्यांनी मग चंदरचा दारूच्या नशेत खून केला.
सुगाव (जि. नांदेड) नांदेडपासून तीन कि. मी. अंतरावरील या गावात ४ आॅगस्ट १९७८ ची क्रूर पहाट उगवली ती जनार्दन जयदेव मवाडे या नवबौद्धाची क्रूर हत्या करूनच. येथेही सवर्णांचा तोच कित्ता. जाळपोळ, मारहाण, लुटालुट. एवढेच नव्हे तर सवर्णांनी दलितांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत विष टाकले होते. बळीरामपूर ऊर्फ धनेगाव गावठाण (जि.नांदेड) येथील दलित वस्तीवर सवर्णांनी ४ आॅगस्ट १९७८ला हल्ला चढविला. त्यात या गावातील दलितांच्या ८४ झोपड्या जाळण्यात आल्या. मराठवाड्यात जास्त संख्येने घरे जाळल्याचे हे दुसरे गाव. पहिले एकलारा तेही नांदेड जिल्ह्यातीलच आहे. एकलारात शंभराहून अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी देण्यात आली. धनेगावच्या घटनेत संभाजी घोडके व जिजाबाईच्या नवजात बालकाचा मृत्यू झाला. परंतु याची सरकार दरबारी नोंद नाही. जळकोट (ता. उदगीर, जि. लातूर) येथे उग्र सवर्ण जमावाने पोलीस उपनिरीक्षक गोविंद भुरेवार यांना ठाण्यातून बाहेर ओढून बेदम मारहाण करून जिवंत पेटवून दिले होते. बंदोबस्तासाठी आलेल्या भुरेवार यांच्यासह केवळ चार जवान होते. जमावाला पाहून भुरेवार यांनी त्यांना ठाणे सोडून देण्यास सांगितले. त्यानंतर जमावाने चाल करून भुरेवार यांचा प्राण घेतला होता.
या आंदोलनात जातीयवाद फक्त सिव्हिलियन नागरिकातच भरला होता असे नव्हे तर पोलीस व अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांतही जाम ठासून भरला होता. याचा प्रत्यय राज्यात ठिकठिकाणी येत होता. पोलीस दलित आंदोलकांवर बेछूट लाठीमार करीत असत. अश्रुधूर व गोळीबारही झाले. नागपुरात ४ आॅगस्ट १९७८ रोजी निघालेल्या आंबेडकरवाद्यांच्या मोर्चावर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्यात अविनाश डोंगरे व ज्ञानेश्वर बुद्धाजी साखरे हे दोघे पंधरा वर्षीय मुले ठार झाली. दिलीप रामटेके , रोशन बोरकर, अब्दुल सत्तार, रतन मंदेडे (नागपूर) हे तिघेही याच गोळीबारात ठार झाले. शब्बीर अली काजल हुसैन (नागपूर) हे देखील अन्य आंदोलनात झालेल्या पोलीस गोळीबारात मारले गेले. दिवाकर थोरात (उस्मानाबाद), भागाजी खिल्लारे (कबीरनगर, औरंगाबाद), रतन परदेशी, डोमाजी कुत्तरमारे, जनार्दन मस्के, भालचंद्र बोरकर, शीला वाघमारे, मनोज वाघमारे हेदेखील नामांतराचे बळी ठरले.
कुष्णूर (ता. बिलोली, जि. नांदेड) येथे ३ व ५ आॅगस्ट १९७८ रोजी दोन दिवस दलित वस्तीवर हल्ले झाले. गावातील सर्वच बौद्धांची १०५ घरे जाळली. काही कौलारू, मजबूत घरे जळेनात म्हणून गावठी स्फोटकांनी उडवून दिली. दलित गाव सोडून पळाले म्हणून जीव वाचले. यासह खामसवाडी, नळगीर, धर्मापुरी, शिसमपालम, आडगाव, अकोला, कंडारी बु., सोनखेड, एकलारा येथील हल्ल्याने अवघे समाजमन बधीर झाले होते. या पंधरवड्यात मराठवाड्यातील जातीय हिंसाचाराने सर्वच सीमा पार केल्या. त्याच्या या कटू आठवणीने आजही दलितांच्या अंगावर काटा उभा राहतो.
नामांतरासाठी अनेकांचे आत्मबलिदान
नामांतर आंदोलनात अनेकांना जीव गमवावा लागला. हजारो आंदोलने झाली. एकच मागणी घेऊन तब्बल १६ वर्षे लढा देऊनही ढीम्म सरकार जागचे हालत नसल्यामुळे अनेक दलितांनी या मागणीसाठी आत्मबलिदानाचे हत्यार उपसले. सोलापूर पोलीस दलातील नारायण ठाकूरदास गायकवाड (पोलीस हवालदार, बक्कल नं. ३०५) यांनी बंदोबस्तात असताना नामांतराची हाक देत स्वत:च्या सर्व्हिस रायफलमधून स्वत:वर गोळ्या झाडल्या.
नांदेडच्या आंबेडकरनगरात राहणारा ३० वर्षीय पँथर गौतम वाघमारे यांनी भरचौकात आत्मदहन केले. विरली बु. (जि.भंडारा ) येथील तरणीबांड १९ वर्षीय सुहासिनी बनसोडे हिने विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळालेच पाहिजे, अशी घोषणा देत सायंकाळी पाच वाजता अग्निज्वालाच्या स्वाधीन झाली. प्रतिभा तायडे (२२, पान्हेरा खेडी, जि. बुलडाणा) हिने ३० डिसेंबर १९९३ रोजी नामांतरासाठी विष प्राशन करून बलिदान दिले. शरद पाटोळे (२१, टेंभुर्णी, जि. सोलापूर) या महाविद्यालयीन तरुणाने ३ जानेवारी १९९४ ला अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विष प्राशन करून शासनाला ललकारले. कैलास पंडित (चौका, औरंगाबाद) याने ३० जुलै १९९२ रोजी नामांतरासाठी पेटवून घेऊन शासनाचा धिक्कार केला. यासह अनेकांनी आत्मदहनाचे प्रयत्न केले. अनेकांनी इशारे दिले.