Namantar Andolan: ‘माझं अख्खं कुटुंबच नामांतर लढ्यात, आई-वडिलांना कारावासही झाला’ : संजय जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:56 PM2019-01-12T13:56:56+5:302019-01-12T13:58:25+5:30
लढा नामविस्ताराचा : मी त्यावेळी लहान होतो. भडकलगेटजवळील मल्टिपर्पज हायस्कूलमध्ये आठवी-नववीत शिकत होतो. तरीही विद्यार्थी चळवळीत सक्रिय होतो. तसं तर नामांतराच्या लढ्यात माझं अख्खं कुटुंबच होतं आणि त्यांनी केलेला मोठा संघर्षही मी जवळून पाहत होतो, असं भारतीय दलित पँथरचे नेते संजय जगताप यांनी सांगितलं.
- स. सो. खंडाळकर
भारतीय दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष असलेले संजय जगताप यांनी एकेकाळी औरंगाबादची महापालिका गाजवली आहे. दलित पँथरच्या माध्यमातून विविध प्रश्नांना वाचा फोडणे, त्यासाठी संघर्ष करणे, आंदोलने करणे हा जणू त्यांचा स्थायीभावच बनून गेला आहे. संजय जगताप हे आक्रमक पँथर म्हणून ओळखले जातात.
संजय जगताप हे नामांतराच्या प्रश्नावर बोलत होते आणि ते ऐकून त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई जगताप उद्गारल्या, मीबी त्या लढ्यात होतेच की अन् ६ डिसेंबर १९७९ रोजी क्रांतीचौकात लाँगमार्च-सत्याग्रहासाठी आलेल्या कितीतरी कार्यकर्त्यांना मी माझ्या हातची बेसन-भाकरी खाऊ घातली होती.
माझे वडील दिवंगत उत्तमराव जगताप, आजोबा सदाशिवराव जगताप, हे सारे नामांतराच्या लढ्यात होते. क्रांतीचौकातील सत्याग्रहात माझ्या आई-वडिलांना अटक झाली. त्यांना हर्सूल कारागृहात नेऊन ठेवलं. पुढं माझाही या लढ्यातला सहभाग वाढला. मोर्चा काढला म्हणून पोलिसांनी अटक केली. हर्सूल जेलमध्ये नेऊन दिवसभर ठेवलं गेलं आणि सायंकाळी सोडून देण्यात आलं होतं. या मोर्चात जयभीमनगरचे नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते, अशी एक आठवण जगताप यांनी ताजी केली. नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते.
त्यांनी सांगितले की, १९९४ साली शरद पवार हे मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा निर्णय होत होता. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी पोलीस यंत्रणा घेत होती. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर जणू पाळतच होती. नामविस्तार झाला आणि आम्ही कार्यकर्ते जयभीमनगरात मिठाई वाटत सुटलो. एवढा आनंद आम्हाला झाला होता.
नामविस्तार झाला; पण विद्यापीठाची प्रगती म्हणावी तशी झाली नाही. साऱ्या वादंगांना बाजूला सारून विद्यापीठाची प्रगती महत्त्वाची वाटते. ही प्रगतीच खऱ्या अर्थानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला आदरांजली ठरणार आहे. या प्रगतीसाठी आता पुन्हा एकदा एकत्रित येऊन विचार करण्याची व प्रसंगी संघर्ष करण्याची गरज असल्याची कळकळही जगताप यांनी व्यक्त केली.