Namantar Andolan : ‘नामांतर आंदोलन हे माझ्या आयुष्यातील पहिले आंदोलन’ : निशा शिवूरकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 04:33 PM2019-01-22T16:33:32+5:302019-01-22T16:54:16+5:30

लढा नामाविस्ताराचा : १४ जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमाच्या बातम्या आल्या की, नामांतर आंदोलनाच्या आठवणी जाग्या होतात. नामांतर आंदोलन हे माझ्या आयुष्यातील पहिले आंदोलन होते. त्या काळात औरंगाबाद शहर नामांतरमय झाले होते. १९८० मध्ये माझ्यावर नामांतरवादी कृती समितीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली. हे माझे पहिले सार्वजनिक पद. म.भि. चिटणीस यांच्या उपस्थितीत मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणात रोज बैठका होत. अशाच बैठका शहरातही होत. सतत कार्यक्रम सुरू असत, अशा शब्दांत अ‍ॅड. निशा शिवूरकर यांनी नामांतर लढ्यातील आपल्या आठवणींना उजाळा दिला. 

Namantar Andolan: 'Namantar movement is the first movement in my life': Nisha Shivkar | Namantar Andolan : ‘नामांतर आंदोलन हे माझ्या आयुष्यातील पहिले आंदोलन’ : निशा शिवूरकर 

Namantar Andolan : ‘नामांतर आंदोलन हे माझ्या आयुष्यातील पहिले आंदोलन’ : निशा शिवूरकर 

googlenewsNext
ठळक मुद्देत्यावेळी आम्ही समतेचे स्वप्न पाहिले होते... 

- स. सो. खंडाळकर

अ‍ॅड. निशा शिवूरकर यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. प्राचार्य उल्हास शिवूरकर हे त्यांचे भाऊ. अलीकडेच ते स.भु. शिक्षण संस्थेचे सहचिटणीस झाले. सध्या अ‍ॅड. शिवूरकर या संगमनेरला असतात. 

नामांतर आंदोलनातील घटनांचे प्रतिबिंब... 
अ‍ॅड. शिवूरकर म्हणाल्या, याच काळात मी दलित युवक आघाडी आणि दलित थिएटरसोबत काम करीत होते. अनेक कवी व लेखक नामांतराच्या पार्श्वभूमीवर लिहीत होते. मी विद्यापीठात एमबीए करीत होते. दलित थिएटरमार्फत आम्ही पथनाट्य करीत असत. आमच्या नाटकांमध्ये नामांतर आंदोलनातील घटनांचे प्रतिबिंब उमटत असे. विद्यापीठात नामांतरवादी व नामांतरविरोधी विद्यार्थ्यांचे गट आपापल्या आघाड्यांवर कार्यक्रम घेत असत; पण एकमेकांशी वागताना तणाव नसायचा. 
 

...आणि फलक लावला! 
एकदा, मी, प्रकाश सिरसाट, प्रा. साहेबराव गायकवाड, प्रा. अविनाश डोळस आणि अन्य मित्रांनी ठरवून रात्री १२ वा. विद्यापीठ गेटवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असा फलक लावला. दुसऱ्या दिवशी गेटवर मोठी गर्दी जमायला लागली. नामांतर झालेच पाहिजे अशा आम्ही घोषणा दिल्या. पोलिसांनी येऊन फलक काढला. नामांतर आंदोलनात तरुणांचा सहभाग मोठा होता. यात सवर्ण तरुणही होते. नामांतर आंदोलनाने भारतीय जातिव्यवस्थेच्या संदर्भात चिकित्सेच्या विचारांना बळ दिले. नामांतर आंदोलन फक्त मराठवाड्यापुरते मर्यादित नव्हते. महाराष्टÑभर पसरले होते. ठिकठिकाणचे समाजवादी, साम्यवादी व पुरोगामी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते, असे त्यांनी नमूद केले.  

विलास ढाणेची आत्महत्या 
अ‍ॅड. शिवूरकर यांनी सांगितले, मला साताऱ्याचा तरुण मित्र विलास ढाणेची आठवण येत आहे. विलास समाजवादी युवक दलाचा कार्यकर्ता. संवेदनशील मनाचा. त्याने नामांतरासाठी आत्महत्या केली. त्याच्या खिशातील चिठ्ठीत‘ नामांतर होईल, असे वाटत नाही, म्हणून मी आत्महत्या करतोय,’ असे लिहिलेले होते. त्याच्या मृत्यूने आंदोलनातील सर्वांनाच चटका लागला. 

१९८१ ला मी संगमनेरला आले. आम्ही संगमनेरला नामांतरवादी कृती समितीची स्थापना केली. त्या माध्यमातून मोर्चा, जेलभरो, सभा सतत सुरू असे. सप्टेंबर १९८२ ला मुंबईत झालेला सत्याग्रह हा नामांतर लढ्यातील महत्त्वाचा टप्पा. या सत्याग्रहाच्या संयोजनाची जबाबदारी साथी महमंद खडस, गजानन खातू, प्रा. संजय म.गो., संजीव साने, मनोहर कदम आदी मित्रांवर होती. मीही सत्याग्रहाच्या तयारीसाठी महिनाभर मुंबईत राहिले. मुंबईच्या वस्त्यांची मला तेव्हाच माहिती झाली. दिवसभर सत्याग्रह व संध्याकाळी दुसऱ्या दिवसाचे नियोजन असा धबडगा होता. फार धावपळीचे अन् आंदोलनाच्या शिक्षणाचे दिवस होते ते, असे सांगत शिवूरकर म्हणाल्या, २०१४ नंतर अस्मितेच्या नावाने देशात गावांची, शहरांची, रस्त्यांची आणि रेल्वेस्थानकांची नावे बदलण्याची लाटच आली आहे. देशातील अल्पसंख्याक समूहांना लक्ष्य बनविण्यासाठी नामांतरे केली जात आहेत. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा तर हा राजकीय कार्यक्रम बनला आहे. अशी नामांतरे देशाच्या इतिहासाशी व देशातील गंगा-जमुना संस्कृतीशी प्रतारणा करणारी आहेत. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे म्हणून चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्यांपुढे समतेचे स्वप्न होते. मराठवाड्यात शिक्षणाचा वटवृक्ष उभा करणाऱ्या बाबासाहेबांचे स्मारक विद्यापीठाच्या रूपात उभे राहावे, ही तळमळ होती.
 

Web Title: Namantar Andolan: 'Namantar movement is the first movement in my life': Nisha Shivkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.