विद्यापीठात संलग्नीकरण समित्यांच्या नावाखाली लूट सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 07:53 PM2019-05-29T19:53:34+5:302019-05-29T19:57:43+5:30
व्यावसायिक अभ्यासक्रम महाविद्यालयाच्या समितीसाठी नेत्यांची धडपड
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयांच्या संलग्नतेसाठी समित्या पाठविण्यात येत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयाच्या समित्यांवर जाण्यासाठी काही प्राध्यापक नेत्यांनी धुडगूस घातला असून, प्रकुलगुरू कार्यालय हतबल झाले आहे. प्रत्येक दिवशी समित्या बदलण्यापासून प्राध्यापक पाठविण्यापर्यंतचे निर्णय बाह्य शक्ती घेत असल्याचा आरोप व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांनी केला आहे. पाठविलेल्या समितीचे सदस्य २५ ते ४० हजार रुपयांची मागणी संस्थाचालकांकडे करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयाचे येत्या शैक्षणिक वर्षात संलग्नता तपासण्यासाठी समित्या पाठविण्यात येत आहेत. या समितीमध्ये प्राध्यापकांची निवड करण्यासाठी प्रकुलगुरू कार्यालयाने अधिष्ठाता मंडळाच्या निर्णयानंतर विद्या परिषदेचे सदस्य डॉ. शंकर अंभोरे, प्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार आणि प्राचार्य मधुसूदन सरनाईक यांची समिती स्थापन केली. या समितीवर संजय निंबाळकर यांनी आक्षेप घेतला आहे.
विद्यापीठ कायद्यानुसार प्रकुलगुरूंना समित्या नेमण्याचा अधिकार आहे. त्यांनी तो वापरला पाहिजे. मात्र, समितीची स्थापना करून काही लोकांचीच मनमानी सुरूअसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ‘नॅक’ झालेल्या महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांना संलग्नता समित्यांवर पाठविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत नाही. विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकही संलग्नता समित्यांवर जात आहेत,असेही त्यांनी स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीबीए, बीसीए, अभियांत्रिकी, एमसीए अशा व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांच्या संलग्नता समित्यांवर जाण्यासाठी प्राध्यापकांची जोरदार लॉबिंग सुरूआहे. यासाठी राजकीय नेत्यांचे दबावही येत आहेत. काही प्राध्यापक मागील पाच ते आठ वर्षांपासून एकाच महाविद्यालयाच्या संलग्नता समित्यांवर जात आहे.
प्रकुलगुरू कार्यालयाने सर्व इच्छुक प्राध्यापकांची नावे समित्यांमध्ये टाकल्यानंतर अपेक्षित महाविद्यालयासाठी आग्रह धरण्यात येत आहे. त्यासाठी दहा ते पंधरा प्राध्यापकांचे टोळके प्रकुलगुरूंच्या दालनाबाहेर कायम असते. पाहिजे त्या महाविद्यालयाच्या समित्यांवर नाव न टाकल्यास जातीवाद, अन्याय, संस्थाचालकांचा दबाव असल्याचा आरोप केला जात असल्याचेही समजते. संलग्नता समित्यामध्ये सुरू असलेल्या गोंधळाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करत ज्या महाविद्यालयांमध्ये नियमबाह्यपणे समित्या पाठविण्यात आल्या आहेत. त्या समित्यांमधील प्राध्यापकांवरही कारवाई करण्याची मागणी संजय निंबाळकर यांनी केली आहे.
२०० महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी धडपड
विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ४२५ महाविद्यालयांपैकी १०० पेक्षा अधिक महाविद्यालयांना कायमस्वरूपी संलग्नता देण्यात आली आहे. उर्वरित विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये २०० महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठीच प्राध्यापकांची धडपड सुरू असल्याचेही समजते. अनुदानित महाविद्यालयांमध्ये २६५० प्राध्यापक आहेत. त्यापैकी समित्यांवर ६०० पेक्षा अधिक प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक टाकण्यात आलेले नाहीत. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात पाकिटे घेण्यात येत असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
व्यवस्थापन परिषदेचा निर्णय खुंटीला
महाविद्यालयाच्या संलग्नता समित्यांमध्ये सदस्य पाठविण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेने निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. उलट नियमबाह्यपणे संलग्नता समित्या देण्यासाठी समितीची स्थापना केली. प्रकुलगुरू कार्यालयाने यात पारदर्शकता ठेवून सोयीसुविधा न देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये पाकिटे न घेणाऱ्या प्राध्यापकांच्या समित्या पाठवाव्यात. तसेच सध्या सुरू असलेल्या गोंधळाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही राज्यपालांकडे करणार आहे.
- संजय निंबाळकर,सदस्य व्यवस्थापन परिषद तथा संस्थाचालक प्रतिनिधी
दोन महिन्याचा विलंब
महाविद्यालयांच्या संलग्नता समित्या देण्यासाठी प्रचंड दबाव येत असल्यामुळे दोन महिने उशीर झाला आहे. संघटनांच्या सततच्या दबावामुळे कामकाज करणे कठीण बनले आहे. माझ्या कार्यालयाने काम नाकारल्यास दुसरीकडे जाऊन दबाव आणला जातो. ही वस्तुस्थिती आहे. नाकारण्यात काही अर्थ नाही. गुणवत्ता तपासणीच्या वेळी काम करण्यास मुक्त संधी मिळाल्यामुळे अतिशय उत्कृष्टपणे काम केले. संलग्नता समित्यांमध्ये मुक्तपणे काम करता आले नाही.
- डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू