समृद्धीच्या बछड्यांचे नाव नागरिकांनीच ठरवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:03 AM2021-02-17T04:03:57+5:302021-02-17T04:03:57+5:30
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील समृद्धी वाघिणीने जन्म दिलेल्या पाचही मादी बछड्यांच्या नामकरणाची तयारी मनपाने सुरू केली आहे. प्रशासक ...
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील समृद्धी वाघिणीने जन्म दिलेल्या पाचही मादी बछड्यांच्या नामकरणाची तयारी मनपाने सुरू केली आहे. प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरवासीयांना बछड्यांसाठी नावे सुचविण्याचे आवाहन केले आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत नागरिकांनी सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयात बछड्यांसाठीची नावे आपल्या मोबाइल क्रमांक व पत्त्यासह पाठवावीत, असे आवाहन केले आहे.
समृद्धी वाघिणीने २५ डिसेंबर २०२० रोजी ५ बछड्यांना जन्म दिला. सध्या या बछड्यांसह वाघिणीची तब्येत चांगली आहे. बछड्यांचा सहा आठवड्यांचा अतिदक्षतेचा कालावधी पूर्ण झाला असून, त्यांचे वजनदेखील आता वाढत आहे. बछड्यांनी डोळेही उघडले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बछड्यांची तपासणी केली. पाचही बछडे मादी आहेत. तीन महिन्यांचे होईपर्यंत या बछड्यांना पिंजऱ्यात ठेवले जाणार आहे. यापूर्वी समृद्धीच्या चार बछड्यांच्या नामकरणासाठी नागरिकांना नावे सुचविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शहरवासीयांनी सुचविलेल्या नावांच्या चिठ्ठ्या काढून त्या चार बछड्यांचे ८ जून २०१९ रोजी कुश, अर्पिता, देविका, प्रगती असे नामकरण करण्यात आले. आता या पाच बछड्यांचा नामकरण सोहळा लवकरच आयोजित केला जाणार आहे. २७ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरवासीयांनी आपली नावे मोबाइल क्रमांक व पत्त्यासह पालिकेच्या सिद्धार्थ उद्यान व पाणिसंग्रहालयात जमा करावीत, असे पालिकेने कळविले आहे.