मैत्रीच्या नावाखाली हॉटेलचालकाला पावणेआठ लाख रुपयांना गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 11:42 AM2018-09-20T11:42:16+5:302018-09-20T11:46:14+5:30
ओळख वाढवून एकाने हॉटेलचालकाची तब्बल पावणेआठ लाखांची फसवणूक केली.
औरंगाबाद : ओळख वाढवून एकाने हॉटेलचालकाची तब्बल पावणेआठ लाखांची फसवणूक केली. १० ते ११ सप्टेंबरदरम्यान बन्सीलालनगरात ही घटना घडली. याप्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
श्रीकांत चौधरी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, वेरूळ लेणी येथील गोपालकृष्ण रामकृष्ण गरिकीपाठी यांच्या हॉटेलवर काही दिवसांपूर्वी आरोपीची ओळख झाली. त्यानंतर आरोपी त्यांच्या हॉटेलवर अनेकदा आल्याने त्यांची मैत्री झाली. गोपालकृष्ण यांनी त्यांना तुम्ही कोठे थांबला आहेत, असे विचारले असता आरोपीने बीड बायपासवरील एका हॉटेलात थांबल्याचे सांगितले. हॉटेलमध्ये न थांबता बन्सीलालनगर येथील त्यांच्या फ्लॅटवर थांबण्याचे निमंत्रण गोपालकृष्ण यांनी त्याला दिले. त्यावरून आरोपी बन्सीलालनगरातील तक्रारदारांच्या फ्लॅटवर राहू लागला.
१० सप्टेंबरला गोपालकृष्ण हे कामानिमित्त लोणार येथे गेले होते. आरोपीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून तुम्ही कोठे आहात असे विचारले. गोपालकृष्ण यांनी लोणार येथे असल्याचे सांगितले. आरोपीने त्यांना तेथेच थांबण्याचे सांगून सोबतच औरंगाबादला जाऊ असे म्हणाला. आरोपी त्यांना तेथे भेटला. त्याला १६ लाख ८० हजार रुपये तातडीने अहमदाबाद येथे पाठवायचे असल्याचे सांगितले. मात्र माझी रक्कम बन्सीलालनगर येथील तुमच्या फ्लॅटमधील कपाटात आहे. ती रक्कम तुम्ही औरंगाबादेत गेल्यानंतर घ्या आणि तुमचे काम करा असे तो म्हणाला.
त्याच्यावर विश्वास ठेवून गोपालकृष्ण यांनी त्यांच्या खात्यातून १६ लाख ८० हजार रुपये आरोपीच्या खात्यात आॅनलाईन वर्ग केले. मात्र तांत्रिक कारणामुळे केवळ ७ लाख ३० हजार रुपयेच वर्ग झाले होते. दरम्यान दोघेही कारने औरंगाबादेत आले आणि बन्सीलालनगर येथे मुक्कामी थांबले. आरोपीने त्यांना ज्यूस पिण्यास दिला. ते दोघे झोपले.
दुसऱ्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता झोपेतून उठले तेव्हा आरोपी तेथून गायब होता. एवढेच नव्हे तर त्यांचा मोबाईल, पाकीट, आधार कार्ड, धनादेश पुस्तिका, डेबिट कार्ड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या खोलीचे दारही बाहेरून बंद होते. आरोपीने त्यांचे डेबिट कार्ड वापरून २४ हजार रुपये काढले. तसेच पेट्रोलपंपावर क्रेडिट कार्ड वापरून सुमारे २१ हजाराचे इंधन भरल्याचे समजले. त्यांनी आरडाओरड करून वॉचमनला बोलावून दार उघडले आणि पोलिसांत धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक बी. के. बनकर तपास करीत आहेत.