घरफोडीत पोलिसांना नाव सांगितल्याचे कारण; शिवाजीनगरमध्ये तीन गुन्हेगारांमध्ये तुफान राडा
By सुमित डोळे | Published: February 29, 2024 08:02 PM2024-02-29T20:02:39+5:302024-02-29T20:03:09+5:30
तीस दिवसांत तीनदा कारागृहात, पुन्हा जामिनावर सुटताच धिंगाणा, पाय तोडण्याचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर : तीस दिवसांत तिसऱ्यांदा गंभीर गुन्ह्यात जामिनावर सुटलेला कुख्यात गुन्हेगार इम्रान रशिद अली सय्यद उर्फ मालेगाव (२८, रा. सातारा) व लल्लन ऊर्फ शेख अय्याज शेख रहिम, सलमान जफ्फर खान (रा. गारखेडा) यांच्यामध्ये टोळीयुद्ध झाले. छावणीच्या घरफोडीत पाेलिसांना नाव सांगितल्याच्या रागातून हे वाद उफाळून आले. त्यात लल्लन व सलमानने इम्रानच्या पत्नीच्या डोक्यात दारूची बाटली फाेडून इम्रानचे दोन्ही पाय फ्रॅक्चर केले तर सलमानदेखील इम्रानच्या मारहाणीत जखमी झाला. रविवारी सायंकाळी ७ वाजता शिवाजीनगरच्या नेहरू महाविद्यालयाजवळ हा राडा झाला. या घटनेमुळे पोलिसांचे रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे नियंत्रण सुटल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
इम्रान व त्याची पत्नी जयश्री सोबत रविवारी सायंकाळी ७ वाजता गारखेड्यात असताना त्याचे अन्य गुन्हेगारांसोबत पैशांवरून वाद झाले. तेवढ्यात लल्लन व सलमानने कारमधून येत त्यांच्यावर हल्ला चढविला. लल्लनच्या पत्नीने इम्रानच्या पत्नीच्या डोक्यात दारूची बाटली फोडली तर सलमानने इम्रानला रस्त्यावर पाडून दोन्ही पायांवर गंभीररीत्या वार केले. या वादात इम्रानने देखील सलमानला पैसे न दिल्यास जिवंत मारून टाकण्याची धमकी दे चाकूने गंभीर वार केले. दोघांच्या परस्पर तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. इम्रान मालेगाव व पत्नीवर शस्त्रक्रिया पार पडली. घटनेनंतर सलमान व लल्लनला उपनिरीक्षक संदीप काळे यांनी तत्काळ अटक केली.
साताऱ्यात राहणाऱ्या इम्रान मालेगाववर आतापर्यंत १० ते ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. मालेगावहून तो काही वर्षांपूर्वी शहरात आला व गुन्हेगारांमध्ये सक्रिय झाला. शहरातील सर्व गुन्हेगारांमध्ये त्याची ऊठबस असते. विशेष म्हणजे, इम्रान मालेगाव, लल्लन, सलमान यांचे त्याच परिसरात वाळूचे ठेले देखील आहेत. त्यातूनही त्यांच्यासह स्थानिक गुन्हेगारांमध्ये वाद आहेत.
-सातारा पोलिसांकडून इम्रान ३० डिसेंबरला घरफोडीत अटकेत.
- त्यात जामिनावर सुटताच ३ जानेवारीला गुन्हेगारांच्या टोळीसोबत गांधीनगरमध्ये राडा करून मोठा तणाव निर्माण केला.
-क्रांती चौक पोलिसांकडून ४ जानेवारीला अटक. त्यात १५ ते २० दिवस तो कारागृहात राहिला.
-त्यातून जामिनावर सुटताच १६ फेब्रुवारीला छावणीत घर फोडून २३ तोळे सोन्यासह लाखोंचा ऐवज चोरला. गुन्हे शाखेकडून २१ फेब्रुवारीला अटक.
-२४ फेब्रुवारीला पुन्हा जामिनावर सुटला. त्यानंतर पुढील २४ तासांत पुन्हा टोळीयुद्ध केले.
लल्लन ऊर्फ शेख अय्याजवर यापूर्वी एक मारहाणीचा तर दोन हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, इम्रान मालेगाव गांधीनगर तणावात जमावाच्या हल्ल्यात बालंबाल वाचला. रविवारच्या घटनेत देखील स्थानिकांनी धाव घेतल्याने त्याचे प्राण वाचले.