‘स्मॉल वंडर’च्या यशाने जालन्याचे नाव जगभरात
By Admin | Published: July 16, 2017 12:20 AM2017-07-16T00:20:17+5:302017-07-16T00:21:39+5:30
जालना : रेडिओ ध्वनी लहरी क्षेत्रात दिवसेंदिवस संशोधन होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : रेडिओ ध्वनी लहरी क्षेत्रात दिवसेंदिवस संशोधन होत आहे. संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, केवळ २.४ मीटर व्यासाचा ‘स्मॉल वंडर’ डीश अॅन्टेना बनविल्याने खर्चातही बचत होऊन कार्यक्षमतेत वाढ झाली आहे. या मिशनच्या यशस्वीतेमुळे जालन्याचे नाव देशातच नव्हे तर जगभरात पोहोचले आहे, असे भू अनुश्रवण केंद्राचे उपसंचालक अजय सिंघल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे केवळ २.४ मीटर व्यासाचा डीश अॅण्टेना बनवून रेडिओ ध्वनी लहरी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपसंचालक अजय सिंघल यांना इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् आणि एशिया बुक आॅफ रेकॉर्डस् या प्रख्यात संस्थांकडून पुरस्कार जाहीर झाला आहे. उपसंचालक सिंघल यांनी यापूर्वी देशभरात गाजलेल्या स्पेक्ट्रमचा व्यावसायिक वापर करणाऱ्या कंपन्या नियम तोडत असल्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा राष्ट्रीय पातळीवर केंद्र सरकारने गौरव केला होता.
याबाबतचे पत्र दोनच दिवसांपूर्वी सिंघल यांना मेलद्वारे प्राप्त झाले आहे. सिंघल म्हणाले की, साधारणपणे साडेचार वर्षांपूर्वी जालना उपग्रह अनुश्रवण केंद्रात बदली झाली. माझे मूळ गाव भोपाळ आहे. इंडियन रेडिओ रेग्युलेटरी सर्व्हिसेसच्या माध्यमातून या क्षेत्रात आलो.
तुलनेने कमी किमतीतव अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशी ‘स्मॉल वंडर’ नावाची डीश अॅण्टेना यंत्रणा तयार केली. तसेच ‘सजग’ हे डेटाबेस सॉफटवेअर विकसित केले. या दोन्ही कार्याची लिम्का बुक आॅफ रेकॉडस्ने नोंद घेतलेली आहे. इस्त्रोच्या मदतीने जालना शहराजवळ १९९३ मध्ये भू अनुश्रवण केंद्र स्थापन करण्यात आले. त्यानंतर पुढील अनेक वर्षांत या केंद्रातील तंत्रज्ञान अद्ययावत झालेले नव्हते. डिजीटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला नव्हता. अंतराळात असलेल्या अनेक उपग्रहांना या केंद्रातून नियंत्रित करताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असे. १९ फेब्रुवारी २०१३ पासून स्पेक्ट्रम आणि ई-सिस्टीम विकसित केली. ज्यात केवळ २.४ व्यासाची डीश अॅण्टेना कार्यान्वित करण्यात आली. कमीत कमी खर्चात आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. दोन बॅण्डद्वारे दहा उपग्रहांचे मॉनिटरींग करण्याची या डीश अॅण्टेनाची क्षमता आहे. तर डेटाबेस सॉफ्टवेअर ‘सजग’ १७ जून २०१४ पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. या प्रकल्पांचा उद्देश हा किमान खर्चात अत्याधुनिक यंत्रणा विकसित करणे हा होता. तसेच अनेक कंपन्यांकडून सॅटेलाईट स्पेक्ट्रमची चोरी केली जात असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मला २०१५ मध्ये पंतप्रधान पुरस्काराने गौरविण्यात आले.