सरकारी रुग्णालय नावालाच; पूर्ण औषधी मिळेना, मेडिकलवर खिसा रिकामा करण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 08:01 PM2024-08-22T20:01:59+5:302024-08-22T20:04:07+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालय, अर्धी औषधी घ्या, अर्धी बाहेरून आणा
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना पूर्ण औषधी मिळत नसल्याची परिस्थिती आहे. ‘अर्धी औषधी घ्या, अर्धी बाहेरून घ्या’ असा सल्ला रुग्णांच्या नातेवाईकांना दिला जातो. त्यामुळे औषधी दुकानांवर खिसा रिकामा करण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर ओढावत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात ओपीडीपासून तर एक्स-रे, सीटी स्कॅनपर्यंतच्या तपासणीसाठी एकही रुपया मोजावा लागत नाही. याठिकाणी नि:शुल्क रुग्णसेवा दिली जात आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
जिल्हा रुग्णालयात रोज ५०० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार
जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी आणि दुपारी अशा दोन वेळेत ओपीडी सेवा दिली जाते. दररोज ५०० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार केले जातात.
बाहेरून घ्यावी लागतात औषधी
ओपीडीत उपचार घेतल्यानंतर रुग्णांना औषधी विभागातून औषधी दिली जातात. याठिकाणी डाॅक्टरांनी जेवढ्या गोळ्या लिहून दिल्या, पेक्षा कमी औषधी देण्याचा प्रकार सुरू आहे तसेच काही औषधी बाहेरून घेण्याचाही सल्ला दिला जातो.
ही पाहा रुग्णालयात गर्दी
- जिल्हा रुग्णालयात औषधींसाठी अशी रांग लागल्याचे पाहायला मिळते.
नातेवाईक परेशान, पाचपैकी तीन औषधी दिल्या
पाचपैकी तीन औषधी दिल्या. त्याही जेव्हढ्या दिवसाच्या लिहिल्या, तेवढ्या मिळाल्या नाहीत. उर्वरित दोन औषधी गोळ्या बाहेरून घेण्यास सांगितल्या.
- अनिता भवर, रुग्णाचे नातेवाईक
चौकशी केली जाईल
रुग्णालयात सर्व प्रकारची औषधी उपलब्ध आहेत. जी औषधी उपलब्ध आहेत, रुग्णांना तिच लिहून दिली पाहिजे. औषधी बाहेरून घेण्यास सांगितले जात असेल तर चौकशी केली जाईल.
- डाॅ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा शल्यचिकित्सक