Namvistar Din : रौप्य महोत्सवी नामविस्तार दिनाचा अपूर्व उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:48 AM2019-01-15T11:48:00+5:302019-01-15T11:55:11+5:30
पांढरेशुभ्र वस्त्र परिधान केलेल्या महिला-पुरुष, तरुण-तरुणींच्या गर्दीने संपूर्ण परिसर फुलून गेला होता.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ गेट परिसर दुमदुमून गेला होता. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे आबालवृद्धांचे जथे विद्यापीठ गेटवर दाखल होत होते. सकाळी ६ वाजल्यापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व शहीद स्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांच्या रांगा लागल्या होत्या. पांढरेशुभ्र वस्त्र परिधान केलेल्या महिला-पुरुष, तरुण-तरुणींच्या गर्दीने संपूर्ण परिसर फुलून गेला होता.
सकाळी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी भडकल गेटजवळ बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर विद्यापीठ गेटपर्यंत शिस्तबद्ध संचलन केले. त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्थांतर्फे प्रबोधनात्मक संचलन व नाटिका सादर करण्यात आल्या. यामध्ये कबीर कला मंचच्या पथनाट्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भीमशक्ती, तसेच विविध संस्था, संघटनांनी भोजनदान, पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था केली होती. विविध पक्ष-संघटना व कलावंतांच्या वतीने संपूर्ण परिसरात प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अजिंठा वसतिगृहालगत भीमशक्तीचे, डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयासमोर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे, आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयासमोर कें द्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विद्यापीठ गेटजवळ रिपब्लिकन सेनेचे, तर गेटसमोरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला लागूनच माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या पँथर्स रिपब्लिकन पार्टीची भव्य व्यासपीठे उभारण्यात आलेली होती. जवळपास सर्वच राजकीय व्यासपीठांसमोर आंबेडकर अनुयायांनी सायंकाळपासूनच गर्दी केली होती.
काँग्रेस पक्षाच्या सभामंडपाजवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेली विंटेज कारही ठेवण्यात आली होती. ही कार सर्वांचे आकर्षण ठरली.
आंबेडकर कला महाविद्यालयाच्या रस्त्यावर दुतर्फा मिठाईची दुकाने, खेळणी, भीम-बुद्ध मूर्तींची दुकाने थाटली होती, तर गेट ते आंबेडकर विधि महाविद्यालय या मुख्य रस्त्यावर पुस्तकांच्या दुकानांवर प्रचंड गर्दी होती. भीम-बुद्ध गीतांच्या ध्वनिफीती, आंबेडकरांचे विविध प्रकारचे फोटो, निळे व पंचशील ध्वज, बॅच, बिल्ले, आंबेडकरांची प्रतिमा असलेले टी-शर्ट आदी दुकानांची रेलचेल होती.
प्रामुख्याने याठिकाणी दुपारपासून ग्रामीण भागातील आंबेडकर अनुयायांनी अलोट गर्दी केली होती. सायंकाळी ६.३० वाजेनंतर शहरातील आबालवृद्धांची गर्दी झाली. याठिकाणी पाय ठेवायलाही जागा नव्हती; मात्र गर्दीवर पोलिसांचे नियंत्रण होते. सकाळपासूनच याठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. येथे आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नामांतराचा प्रदीर्घ लढा जिंकल्याचा आनंद, तर दुसरीकडे नामांतर लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या भीमसैनिकांप्रती कृतज्ञभाव दिसून येत होता.
दलित पँथरच्या भीमगीतांना प्रतिसाद
भारतीय दलित पँथरप्रणीत पंचशील समाजसेवा कलाविकास अकादमीने दुपारीच भीमगीतांचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला अनुयायांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. अभिवादनासाठी येणारे अनुयायी भीमगीते ऐकण्यासाठी पँथरतर्फे उभारण्यात आलेल्या पेंडॉलमध्ये येऊन बसत होती. अंगावर शहारे आणणारी भीमगीते सादर झाल्यावर त्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसादही देण्यात येत होता. यावेळी संजय जगताप, प्रकाश जाधव, प्रल्हाद गवळी, प्रल्हादराव जगताप, साहेबराव मोरे आदी उपस्थित होते.
क्षणचित्रे
- थांबा हो थांबा गाडीवाले दादा ...भिवा माझे नाव राहिले दूर हे माझे गाव, गाडीत घ्या ना मला, हे गीत गाऊन निशा भगत यांनी ‘बाळ भीमराव’ या चित्रपटाचे प्रमोशन केले.
- मराठवाड्यातून आबालवृद्ध सायंकाळी पाच वाजेपासून ते रात्री दहापर्यंत सभेसाठी बसलेले होते.
- शाहीर मेघानंद जाधव आणि टीमने गायलेल्या भीमगीतांना भीमसैनिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
- आनंदराज आंबेडकर यांच्या सभेच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेसाठी बाऊन्सर ठेवण्यात आले होते.
- नामविस्तार लढा हा आमच्या अस्तित्वाचा विषय होता
- नामांतर शहिदांची आठवण भाषणात मान्यवरांनी काढली
- दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली
- पुस्तकांची, आॅडिओ, व्हिडिओची दुकाने होती
- पथनाट्यातून प्रबोधन करण्यात येत होते
- कलावंतांकडून स्टेजवर भीमगीतांतून प्रबोधन सुरू होते
- विद्यापीठ गेटसमोर शहीद स्तंभ, तसेच पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासून गर्दी झाली होती.
- पाणी वाटप व अन्नदानाचे स्टॉल विविध ठिकाणी लावण्यात आले होते.