नानांनी ‘झेडपी’ची बेइज्जती थांबवावी; स्थायी समिती बैठकीत सदस्यांच्या भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 04:06 PM2018-08-25T16:06:55+5:302018-08-25T16:07:42+5:30
नानांनी जिल्हा परिषदेला बेइज्जत करणे थांबवावे, अशा भावना जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी सदस्यांनी व्यक्त केल्या.
औरंगाबाद : हरिभाऊ बागडे (नाना) हे आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत. विधानसभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांचे सर्वोच्च स्थान आहे. राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते किंवा कॅबिनेट मंत्र्यांना त्यांच्यासमोर बसावे लागते; परंतु किरकोळ प्रश्नांवर जिल्हा विकास समितीमध्ये बोलण्यासाठी पालकमंत्र्यांकडे सातत्याने विनंती करीत असतात, हे बरे नाही. त्यांनी जिल्हा परिषदेला बेइज्जत करणे थांबवावे, अशा भावना जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी सदस्यांनी व्यक्त केल्या.
जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी स्थायी समितीची बैठक झाली. बैठकीत सदस्य किशोर बलांडे यांनी कोल्हापुरी गेटच्या मुद्यावर चर्चेला सुरुवात केली. ते म्हणाले की, १७ व १८ सप्टेंबर २०१५ रोजी अतिवृष्टीमुळे फुलंब्री व औरंगाबाद तालुक्यांतील रस्ते, पूल, कोल्हापुरी बंधारे वाहून गेले. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदने दिली. जिल्हा नियोजन समिती व शासनाकडून यासंदर्भात विशेष प्रतिसाद मिळाला नाही. बागडे नानाही निधी मिळविण्यासाठी कमी पडले. असे असताना त्यांनी परवा जिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्हा परिषदेची बेइज्जती केली. तेव्हा भाजपचे सदस्य मधुकर वालतुरे यांनी आक्रमक भूमिका घेत किशोर बलांडे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. बेइज्जती नव्हे नानांनी जिल्हा परिषदेच्या कारभाराप्रती खंत व्यक्त केली, असा उल्लेख करा, यावर त्यांनी जोर दिला.
दरम्यान, या दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू असतानाच जि.प.चे उपाध्यक्ष केशवराव तायडे यांनी जिल्हा परिषदेच्या कारभारामध्ये राजकारण करू नका. जिल्हा परिषदेत शिवसेना व काँग्रेसची सत्ता असल्यामुळे भाजपला वाईट वाटत असावे, याकडेही त्यांनी भाजप सदस्यांसह सभागृहाचे लक्ष वेधले. याचवेळी अविनाश गलांडे म्हणाले की, जिल्हा परिषदेत जरी सेना-भाजप युतीची सत्ता नसली, तरी केंद्र व राज्यात युतीचीच सत्ता आहे. नाना हे आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा काही गैरसमज झालेला असेल, तर त्यांना आपण सर्व जण जाऊन भेटू. गेटचा विषय त्यांच्याकडेच संपवून टाकू. यासाठी त्यांची वेळ घेण्याची जबाबदारी भाजप सदस्यांवर टाकली.
भाजपचा आवाज कमी पडला
हरिभाऊ बागडे यांनी जिल्हा परिषदेच्या कारभारावर केलेला हल्लाबोल भाजप वगळता अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्वच सदस्यांच्या जिव्हारी लागल्याचे स्थायी समितीच्या बैठकीत जाणवले. अध्यक्षा डोणगावकर म्हणाल्या की, नानांनी वर्गखोल्यांचा प्रस्ताव दिला होता. तो मंजूर केला. त्यांनी रस्त्यांच्या कामांत बदल करण्याचे प्रस्तावित केले होते. ते कामही केले. तरीही त्यांनी आमच्या कार्यक्षमतेबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजपने राजकारण करू नये, अशा कधी संतप्त, तर कधी मवाळ भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. मात्र, विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी भाजप सदस्य कमी पडले. उपस्थित भाजपच्या तीन सदस्यांपैकी एकट्या मधुकर वालतुरे यांनाच प्रत्येक वेळी खिंड लढवावी लागली.