नांदेड जिल्ह्यात मुस्कान मोहिमेअंतर्गत २१९ चिमुकल्यांची झाली घर वापसी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 05:15 PM2018-01-02T17:15:47+5:302018-01-02T17:17:43+5:30
अनाथांचे जीवन जगणार्या बालकांसाठी पोलीस दलाच्या वतीने आॅपरेशन मुस्कान मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेअंतर्गत महिला सहाय्य कक्षाने ५ मुली व २१४ मुलांना त्यांच्या कायदेशीर पालकांच्या ताब्यात देवून खर्या अर्थाने त्यांच्या चेहर्यावर मुस्कान आणण्याचे काम केले.
नांदेड : किरकोळ कारणावरुन घरातून पळून गेलेल्या किंवा आईवडिलांसोबत ताटातूट झाल्यामुळे अनाथांचे जीवन जगणार्या बालकांसाठी पोलीस दलाच्या वतीने आॅपरेशन मुस्कान मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेअंतर्गत महिला सहाय्य कक्षाने ५ मुली व २१४ मुलांना त्यांच्या कायदेशीर पालकांच्या ताब्यात देवून खर्या अर्थाने त्यांच्या चेहर्यावर मुस्कान आणण्याचे काम केले.
राज्यभरात दरवर्षी हजारो बालके बेपत्ता होतात, परंतु त्यांचा शोध घेण्यास अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलीस दलाच्या वतीने राज्यभर १ ते ३१ जुलैदरम्यान आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले़ या मोहिमेद्वारे अशा बालकांचा शोध घेवून त्यांना त्यांच्या कायदेशीर पालकांच्या स्वाधीन करण्यात येते़ नांदेड जिल्ह्यात मोहिमेअंतर्गत ५ मुली व २१४ मुले सापडली़ त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले़ त्याचबरोबर महिला सहाय्य कक्षाच्या वतीने वर्षभरात नेत्रदीपक कामगिरी करण्यात आली़ या कक्षाकडे वर्षभरात एकूण ६८२ तक्रारी आल्या होत्या़ त्यामध्ये दोन्ही पक्षाच्या मंडळींची समजूत घालून १२९ प्रकरणांमध्ये तडजोड घडवून आणल्या गेली. काही प्रकरणांत न्यायालय, आपसात तडजोडी करण्यात आल्या़ तसेच २२ महिलांना संरक्षण अधिकार्यांच्यामार्फत नांदावयास पाठविण्यात आले़ ४९ दखलपात्र प्रकरणे पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आली़ तर १११ प्रकरणांमध्ये महिलांनी त्यांच्या सासरच्या मंडळीविरुद्ध ठाण्यात तक्रार दिली़
ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे़ गत वर्षभरात या समितीकडे ज्येष्ठ नागरिकांच्या २२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़ त्यातील २१ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत़ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाचे कामकाज चालत असून पोना़ दत्ता जाधव, पंचफुला फुलारी, मीरा वच्छेवार, विमल पोतदार, उज्ज्वला दिग्रसे, अंजली ठाकूर, शेख आमरीन, सीमा जोंधळे हे कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. महिला सहाय्य कक्षामुळे पीडित महिला, ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे.