गुरूवारपासून नांदेड-मुंबई विमानसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:14 AM2017-11-13T00:14:53+5:302017-11-13T00:15:04+5:30
केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत घोषित करण्यात आलेल्या नांदेड-मुंबई या मार्गावरील विमानसेवेला १६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत घोषित करण्यात आलेल्या नांदेड-मुंबई या मार्गावरील विमानसेवेला १६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे़ नांदेड विमानतळाच्या रनवेच्या दुरूस्तीचे काम १३ नोव्हेंबर रोजी पूर्ण होण्याची अपेक्षा असून त्याबाबतचा अहवाल विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविला जाणार आहे़ हा अहवाल प्राप्त होताच नांदेड-मुंबई या बहुप्रतिक्षित विमानसेवेला प्रारंभ होणार आहे़
केंद्र शासनाने देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी परवडेल अशा दरात उडान योजनेतून विमानसेवा सुरू केली होती़ त्यात नांदेड येथून हैदराबाद आणि मुंबई शहरांसाठी दररोज विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता़ त्यातील नांदेड-हैदराबाद ही विमानसेवा सुरू झाली, मात्र नांदेडकरांना मुंबईला जाण्यासाठी सेवा हवी होती़ याबाबत अनेकदा काँग्रेसकडून प्रश्नही विचारण्यात आले होते़ खा़ अशोकराव चव्हाण यांनीही नांदेड-मुंबई मार्गावरील विमानसेवेचा केंद्राला विसर पडला की काय? असा सवालही केला होता़
नांदेड विमानतळाच्या रनवेच्या दुरूस्तीचे काम आवश्यक असल्याने नांदेड-मुंबई विमानसेवेला उशीर झाल्याचे सांगण्यात येत होते़ मात्र नांदेड विमानतळाच्या रनवेच्या दुरूस्तीचे काम हाती घेऊन ते पूर्ण करण्यात आले आहे़ १३ नोव्हेंबर रोजी दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर १६ नोव्हेंबरपासून मुंबईहून दुपारी १२़४५ वाजता सुटणारे विमान दुपारी २ वाजून २० मिनिटांनी नांदेडमध्ये पोहोचेल़
तर नांदेडहून सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी सुटणारे विमान मुंबईत दुपारी १२ वाजून १० मिनिटास पोहोचेल़ रनवेच्या दुरूस्ती कामासाठी बंद पडलेली नांदेड-हैदराबाद विमानसेवाही १६ नोव्हेंबरपासूनच सुरू होणार आहे़ हैदराबाद येथून सकाळी ९ वाजता निघणारे विमान सकाळी १० वाजता नांदेडात तर नांदेडहून दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सुटणारे विमान दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी हैदराबाद येथे पोहोचणार आहे़ ट्रूजेट द्वारे ही सेवा चालविली जाणार आहे़
उडान योजनेअंतर्गत नांदेड-हैदराबाद या मार्गावरील सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे़ आता नांदेड-मुंबई या मार्गावरील विमानसेवेला प्रारंभ होणार आहे़ नांदेड-मुंबई या दररोज उपलब्ध राहणाºया विमानसेवेला आता प्रवाशांचा कितपत प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागले आहे़ विशेष म्हणजे, यापूर्वी सुरू असलेली नांदेड-मुंबई विमानसेवा ही प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे बंद पडली होती, हे विशेष़