विद्यार्थ्यांना वाव देणारे नांदेड विद्यापीठ देशात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:50 AM2017-09-27T00:50:27+5:302017-09-27T00:50:27+5:30
कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करणारे नांदेड विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देवून रोजगाराभिमुख शिक्षण देणारे नांदेड विद्यापीठ हे देशात अव्वल असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करणारे नांदेड विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देवून रोजगाराभिमुख शिक्षण देणारे नांदेड विद्यापीठ हे देशात अव्वल असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.
आखाडा बाळापूर येथील नारायणराव वाघमारे महाविद्यालयात २६ सप्टेंबर रोजी एक दिवसीय कौशल्य विकास ‘एसईसी’ अभ्यासक्रमावर आधारीत कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष कृष्णराव पाटील जरोडेकर तर उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे कुलगूरू डॉ. पंडित विद्यासागर यांची उपस्थिती होती. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. विठ्ठल एरंडे, प्राचार्य डॉ. पी.यू. गवई, प्रा. डॉ. कैलास पाटील, प्रा.डॉ. सचिन पवार, प्रा. डॉ. नरेश पिनमकर, प्राचार्य डॉ. निवृत्ती कौसल्ये उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, जगातील ६६ टक्के विदरान, शास्त्रज्ञ, विचारवंत हे प्रतिकूल परिस्थितींवर मात करून तयार झाले आहेत. संकटाला संधी समजून आपला विकास करण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे. ग्रामीण भाग हा आपला मागासलेपणाचा निकष ठरवू नये, कारण गुणवत्तेला जात, धर्म किंवा भौगोलिक क्षेत्राची मर्यादा असू शकत नाही. त्यामुळे न्यूनगंड सोडून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळविण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
गुणवत्तापूर्ण शिक्षणाला आता विद्यापीठाने कौशल्य विकासाची जोड दिली आहे. कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करणारे नांदेड विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे. आता नांदेड विद्यापीठ देशातील विद्यापीठांचे नेतृत्व करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजे. कठोर परिश्रमाला पर्याय नाही, असेही ते म्हणाले अध्यक्षीय समारोप करताना कृष्णराव पाटील जरोडेकर यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक विकास व ग्रामीण भागातील माणसिकता या विषयावर विचार मांडले.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. निवृत्ती कौसल्ये यांनी केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या विविध विकासाचा आलेख मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी.आर. देशमुख यांनी केले.