नांदेडकरांनो, दिखाव्याला भुलू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:20 AM2017-09-25T00:20:46+5:302017-09-25T00:20:46+5:30
माझ्याविरोधात खुद्द नरेंद्र मोदी नांदेडमध्ये येवून गेले़ त्यामुळे आता कोणीही आले तरी, त्याचा कोणताही परिणाम नांदेडच्या जनतेवर होणार नाही याची खात्री आहे़ मात्र तरीही सावधगिरी बाळगा़ ज्या पक्षाने नेते आयात केले आहेत, ज्या पक्षाकडे नेतृत्व नाही एवढेच कशाला कालपरवा ज्यांनी भाडेतत्त्वावर पक्षाचे कार्यालयही घेतले आहे़ यांना नांदेडशी कसलेही देणेघेणे नाही़ उद्या निवडणूक संपली की, बाडबिस्तारा गुंडाळून जातील़ त्यामुळे दिखाव्याला न भूलता नांदेडच्या विकासाची नाळ जुळलेल्या काँग्रेसच्याच पाठीशी रहा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : माझ्याविरोधात खुद्द नरेंद्र मोदी नांदेडमध्ये येवून गेले़ त्यामुळे आता कोणीही आले तरी, त्याचा कोणताही परिणाम नांदेडच्या जनतेवर होणार नाही याची खात्री आहे़ मात्र तरीही सावधगिरी बाळगा़ ज्या पक्षाने नेते आयात केले आहेत, ज्या पक्षाकडे नेतृत्व नाही एवढेच कशाला कालपरवा ज्यांनी भाडेतत्त्वावर पक्षाचे कार्यालयही घेतले आहे़ यांना नांदेडशी कसलेही देणेघेणे नाही़ उद्या निवडणूक संपली की, बाडबिस्तारा गुंडाळून जातील़ त्यामुळे दिखाव्याला न भूलता नांदेडच्या विकासाची नाळ जुळलेल्या काँग्रेसच्याच पाठीशी रहा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़
शहरात रविवारी तरोडा भागातील भक्ती लॉन्स येथे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात खा. चव्हाण बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री आ. डी. पी. सावंत, पक्षप्रवक्ते राजू वाघमारे, आ. अमरनाथ राजूरकर, आ. वसंतराव चव्हाण, माजी आ. हणमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आ. रावसाहेब अंतापूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खा. चव्हाण म्हणाले, काँग्रेसकडे नेतृत्व आहे. भाजपाकडे मात्र नेतृत्वच नाही. बाहेरचे नेते नांदेडमध्ये येत आहेत. पक्षाबाहेरुन भाजपचे नेतृत्व केले जात आहे. आयाराम-गयारामांची फौज आपल्यापुढे असून तत्त्व, दिशा आणि नेतृत्वही नाही. देशात आणि राज्यातही भाजपाची हीच स्थिती आहे. नांदेडमधून कमळाचा परतीचा प्रवास सुरू होवून तो देशपातळीवर थांबेल यासाठी आता सर्वांनी काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. नांदेडमध्ये मते फोडण्याचा प्रयोग तीन वर्षांपूर्वी झाला मात्र नांदेडमध्ये दोन वर्षांपूर्वी तो पतंग कटून गेला आहे. त्यामुळे मतविभाजनाचा प्रयोग आता यशस्वी होणार नाही.
देशात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाने मागील तीन वर्षांत जनतेला काय दिले? असा सवाल उपस्थित करताना महाराष्ट्रात मागील पाच महिन्यांत सहाशेपेक्षा अधिक शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. नांदेडमध्ये आज पेट्रोलचे दर ८१ रुपयांवर नेवून रेशन दुकानातून मिळणारी साखर बंद करणाºया भाजपाला नांदेडमध्ये मते मागण्याचा अधिकार आहे काय? असेही ते म्हणाले.
महापालिकेत काँग्रेसने विकासाचा अजेंडा घेऊन सत्ता राबविली आहे. आजघडीला विरोधकाकडे मात्र केवळ अशोक चव्हाणांना शिव्या देणे हाच एकमेव अजेंडा आहे. मला जेवढ्या शिव्या द्याल तेवढी जास्त मते मिळतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या मेळाव्यात बोलताना माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी खा. चव्हाणांवर राज्यभरातून टीका होत आहे. या टीकेला उत्तर देण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले. राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणारी ही निवडणूक आहे. तीन वर्षे सत्तेत असलेल्या भाजपाने सामान्य जनतेला काहीच दिले नाही. उलट नांदेड महापालिकेची विकासकामे थांबविण्याचे काम या सरकारने केले आहे. विकास थांबवणाºयांना आता धडा शिकवण्यासाठी नांदेडकरांनी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले़ पक्ष प्रवक्ते वाघमारे यांनी नांदेडमध्ये काँग्रेसला प्रतिस्पर्धी नसल्याचे सांगितले. अंतर्गत वादामुळे जिल्ह्यातील भाजपा स्वत:च संपणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आता बीजेपीमुक्त नांदेडसाठी काम करण्याचे आवाहन केले.
आ. राजूरकर यांनी भाजपासह इतर फुटकळ पक्षांना काँग्रेसची ताकद काय आहे? हे दाखवून देऊ, असे सांगितले. ज्यांच्या नेतृत्वाच्या विश्वासावर भाजपा मैदानात आली आहे त्यांना काँग्रेसने लोहा, कंधार नगरपालिकेत पाणी पाजले असल्याचे त्यांनी सांगितले.
आ. वसंतराव चव्हाण, माजी आ.हणमंतराव बेटमोगरेकर, लियाकत अन्सारी यांनीही यावेळी मार्गदर्शन करताना नांदेड मनपा प्रचारकार्यात ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी वेळ देण्याची गरज आहे़ असे सांगितले़
प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांनी औकात नसलेले नेते आज चव्हाणांवर टीका करीत असल्याचे सांगितले. त्यांना चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे. नांदेड जिल्ह्याचा सातबारा अशोकरावांच्याच नावे असल्याचे ते म्हणाले.
या मेळाव्यास नरेंद्र चव्हाण, केशवराव इंगोले, गंगाधर सोंडारे, संभाजी भिलवंडे, नामदेव केशवे, बी.आर. कदम, गणपतराव तिडके, नारायण सिडाम, रंगनाथ भुजबळ, बाबूराव पवार, विकास पाटील देवसरकर, मंगला धुळेकर, जि. प. सदस्या मंगाराणी अंबुलगेकर, सुमती व्याहाळकर, अनिता इंगोले, सुभाष पाटील यांच्यासह जि. प. सदस्य, सभापती यांच्यासह काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.