नंदीग्राम एक्स्प्रेसचे इंजिन नादुरुस्त; दिडतास प्रवासी ताटकळले
By संतोष हिरेमठ | Published: September 14, 2022 11:12 PM2022-09-14T23:12:34+5:302022-09-14T23:13:39+5:30
नंदीग्राम एक्स्प्रेस बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास परतूरजवळ असताना अचानक इंजिन नादुरुस्त झाले.
औरंगाबाद : रेल्वे इंजिन नादुरुस्त्या घटना सुरुच असून, बुधवारी मुंबईला जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसचे इंजिन परतूरजवळ नादुरुस्त झाले. परिणामी, दररोज रात्री ९.३० वाजता येणारी ही रेल्वे रात्री ११ वाजेपर्यंतही औरंगाबादला आली नव्हती. त्यामुळे प्रवासी रेल्वेस्टेशनवर ताटकळले.
नंदीग्राम एक्स्प्रेस बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास परतूरजवळ असताना अचानक इंजिन नादुरुस्त झाले. याविषयी रेल्वे प्रशासनाला माहिती मिळताच जालन्याहून दुसरे इंजिन पाठविण्यात आले. त्यादरम्यान इंजिन दुरुस्तीचा प्रयत्न सुरु होता. अखेर इंजिन दुरुस्त झाले आणि ही रेल्वे पुढील प्रवासासाठी सज्ज झाली.
मात्र, यासगळ्यात जवळपास दीड तासांचा वेळ गेला. त्यामुळे रेल्वेतील प्रवाशांबरोबर औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर ताटकळलेल्या प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले. रेल्वे प्रवासी संघटनेचे राजकुमार सोमाणी म्हणाले, इंजिन नादुरुस्तीच्या घटनेमुळे नंदीग्राम एक्स्प्रेस दीड तास उशीराने धावली. परतूर येथे रेल्वेचे इंजिन नादुरुस्त झाल्याने नंदीग्राम एक्स्प्रेस उशीराने धावल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.