अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मुकुट सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्याला
By सुमेध उघडे | Published: November 8, 2022 05:31 PM2022-11-08T17:31:30+5:302022-11-08T17:32:59+5:30
९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
औरंगाबाद: ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. हे साहित्य संमेलन वर्धा येथे होणार आहे. उदगीरला झालेल्या ९५ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे होते. मराठवाड्याला अध्यक्षपदाचा सलग दुसऱ्यांदा बहुमान मिळाला आहे.
संमेलनाध्यक्षपदी खासदार दत्ता मेघे यांची निवड करण्यात आली असून या संमेलनाच्या संरक्षकपदाची जबाबदारी माजी आ. सागर मेघे यांनी स्वीकारली आहे. वर्धा जिल्ह्यात तब्बल ५६ वर्षांनी सारस्वतांचा महामेळा पुन्हा अनुभवता येणार आहे. वर्धा जिल्ह्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. हा जिल्ह्याला ऐतिहासिकदृष्ट्या महत्व आहे. १९६७ मध्ये वर्ध्यात ४८ वे संमेलन झाले होते. आता २०२३ मध्ये म्हणजेच जवळपास ५६ वर्षांनी ही संधी वर्ध्याला पुन्हा मिळाली आहे. वर्ध्यातील स्वावलंबी महाविद्यालयाच्या मैदानावर हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. हे साहित्य संमेलन दिनांक ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या भव्य पटांगणावर आयोजित होणार आहे.
सलग दुसऱ्यावर्षी मराठवाड्यातील अध्यक्ष
कोरोना महामारीनंतर दोन वर्षाच्या खंडानंतर ९४ वे साहित्य संमेलन नाशिकमध्ये पार पडले होते. त्यानंतर केवळ चार महिन्यानंतर ९५ वे साहित्य संमेलन उदगीर येथील उदगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात २२ ते २४ एप्रिल दरम्यान पार पडले. यावेळी अध्यक्ष भारत सासणे होते तर आता ९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना मिळाला आहे. विशेष म्हणजे हे दोघेही मराठवाड्यातील आहेत. यामुळे सलग दुसऱ्यावर्षी अध्यक्ष पदाचा मान मराठवाड्याला मिळाला आहे.