नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरण; मारेकऱ्यांनी केला छत्रपती संभाजीनगर, जालन्यात गोळीबाराचा सराव
By सुमित डोळे | Published: May 11, 2024 12:46 PM2024-05-11T12:46:09+5:302024-05-11T12:46:51+5:30
तीन विचारवंतांच्या हत्येत छत्रपती संभाजीनगरचे कनेक्शन उघडकीस आले आहे
छत्रपती संभाजीनगर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत विशेष न्यायालयाने शुक्रवारी सचिन अंदुरे (रा. धावणी मोहल्ला) व शरद कळसकर (रा. केसापुरी, दौलताबाद) यांना जन्मठेपेच्या शिक्षेसह ५ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. एम. कॉम. पर्यंत शिकलेला सचिन औरंगपुऱ्यातील एका कापड व्यापाऱ्याकडे कामाला होता. त्याचा मित्र शरद बारावीनंतर शिक्षण सोडून कोल्हापूरला वैभव राऊतकडे चालक होता. सीबीआयच्या तपासानुसार दोघांनी हत्येपूर्वी हनुमान टेकडी व जालन्यात गोळीबाराचा १३ दिवस सराव केला होता. आवश्यक रेकी पूर्ण झाल्यावर हत्येच्या आधी रात्री दोघेही दुचाकीने छत्रपती संभाजीनगरहून पुण्यात गेले. शरद दुचाकी चालवत होता तर सचिनने गोळीबार करून दोघेही तत्काळ सायंकाळपर्यंत पुन्हा शहरात दाखल झाल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे.
२० ऑगस्ट, २०१३ रोजी दाभोलकर यांची सकाळी मॉर्निंग वॉक दरम्यान भर रस्त्यावर दुचाकीस्वार मारेकऱ्यांनी गोळी झाडून हत्या केली. देशाला हादरून सोडणाऱ्या या हत्येनंतर तपासातल्या दिरंगाईमुळे राज्यभर सातत्याने आंदाेलन सुरू झाले. जून, २०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवला. २०१८ मध्ये गौरी लंकेश हत्येत चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या परशुराम वाघमारे याच्या चौकशीत पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरचे कनेक्शन समोर आले. ऑगस्टमध्ये एटीएसने नालासोपाऱ्यात वैभव राऊतच्या घराच्या छाप्यात मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. त्यातच शरदचे नाव निष्पन्न झाले. शरदला अटक केल्यानंतर स्थानिक एटीएसने आठ दिवस सचिनच्या हालचालींवर लक्ष ठेवून १६ ऑगस्ट, २०१८ रोजी अटक केली.
सचिनचे एम. कॉम.पर्यंत शिक्षण, धार्मिक कार्यासाठी निधी
-धावणी मोहल्ल्यात वाढलेल्या सचिनचे शालेय शिक्षण गुजराती विद्यालयात झाले. पुढे स. भु. महाविद्यालयातून तो एम. कॉम. झाला. अकोला, पैठणमध्ये त्याचे जवळचे नातेवाईक राहतात. औरंगपुऱ्यात त्याचे सासर आहे. सचिन अत्यंत धार्मिक वृत्तीचा आहे. महाविद्यालयातील मैत्रिणीसोबत त्याने २०१५ मध्ये प्रेमविवाह केला. १६ ऑगस्ट, २०१८ रोजी अटक झाली, तेव्हा त्याची त्याची मुलगी चार महिन्यांची होती.
-निराला बाजारच्या व्यापाऱ्याकडे सचिन व त्याची पत्नी २००८ पासून नोकरीला होते. अटकेवेळी त्याला १६ हजार रुपये पगार होता. व्यापाऱ्याच्या दाव्यानुसार सचिन अत्यंत प्रामाणिक व सतत मदत करण्याचा स्वभावाचा होता. त्यामुळे त्याला रोख रकमेपासून ते धनादेशावर सही करण्यापर्यंत अधिकार दिला होता. तो सातत्याने अनाथाश्रम, गोशाळेला मदत करत होता.
आधी सोडले, मग पुन्हा उचलले
८ ऑगस्ट, २०१८ पासून एटीएसचे निरीक्षक गौतम पातारे यांचे पथक सचिनच्या मागावर हाेते. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता त्यांनी सचिनला ताब्यात घेऊन रात्री सोडून दिले. घरी पोहोचल्यावर सचिन जेवायला बसताच सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घरात जात ‘चौकशी करायची आहे, तुझ्या जिवाला धोका आहे, आमची गाडी बुलेटप्रूफ आहे’, असे सांगून ताब्यात घेतले. पातारे यांनी त्याच्या घरातून पासबुक व काही धार्मिक पुस्तके जप्त करून सीबीआयच्या ताब्यात दिली होती.
-सीबीआयने सचिनशी संबंधित शहरातील १३ जणांचे जबाब नोंदवले. त्याच्या देवळाईतील मित्राच्या घरीदेखील छापेमारी झाली होती.
तेरा दिवस सराव
दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वी सचिन व शरदने हनुमान टेकडीच्या निर्जन परिसरात गोळीबाराचा सराव केला होता. एटीएसने परिसराची पाहणी करून त्याचा कागदी नकाशादेखील सीबीआयला पाठवला होता. सराव पूर्ण झाल्यावर जालन्यातील सहकाऱ्याने 'आता मुहूर्त काढा' या सांकेतिक भाषेत हत्येचा दिवस ठरवला होता. त्यावेळी जालन्याच्या एका माजी नगरसेवकाला अटक केली होती.
शरद आईला म्हणाला होता, 'मी परत येईन’
दाभोलकरांसह कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचाही शरदवर ठपका आहे. २० जून, २०१९ रोजी कोल्हापूरच्या पथकाने त्याला केसापूरमध्ये आणत दिवसभर सहा एकर शेताची पाहणी केली होती. निघताना तो आईला 'मी लवकरच परत येईन' असा म्हणाला होता. शुक्रवारी निकाल लागला तेव्हा शरदच्या घराचे दार बंद होते तर सचिनचे कुटुंब पुण्यात न्यायालयात उपस्थित होते.
चार विचारवंतांची हत्या अन् छत्रपती संभाजीनगर कनेक्शन
-सचिन, शरदच्या अटकेनंतर पुढील २ वर्षे दाभोलकरांसह देशातील अन्य ३ विचारवंतांच्या हत्येत शहराचे कनेक्शन निष्पन्न होत गेले. पानसरे यांची १६ फेब्रुवारी २०१५ रोजी हत्या झाली. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये कर्नाटकचे विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची तर २०१७ मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली.
-लंकेश यांच्या हत्येत तपास पथकाने ताब्यात घेतलेला संशयित अमोल काळे व सचिन, माजी नगरसेवक जालन्याच्या सरकारी रुग्णालयाच्या आवारात भेटल्याची कबुली दोघांनी दिली होती.
-पुढे २०१९ मध्ये एन-९ मधून ऋषिकेश भास्कर देवडीकर याला कर्नाटक पोलिसांनी लंकेश यांच्या हत्येच्या संशयात अटक केली.
निकाल धक्कादायक; पण न्यायव्यवस्थेवर विश्वास
शरदला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर केसापुरी गावात मात्र स्मशानशांतता होती. बाहेर गेलेले त्याचे आई-वडील सायंकाळी घरी परतले. त्यानंतर त्यांनी दरवाजा लावून घेतला. त्याच दरम्यान त्याच्या भावासोबत बाेलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हा निकाल धक्कादायक असल्याचे सांगितले. परंतु, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आम्ही लवकरच या निकाला विरोधात उच्च न्यायालयात दाद मागू, असे त्यांनी स्पष्ट केले.