नाशिकचे पाणी जायकवाडीत दाखल; २४ तासात पाणीपातळीत मोठी वाढ; पाणीसाठा ४० टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 07:50 PM2022-07-12T19:50:13+5:302022-07-12T19:50:37+5:30
आजही नाशिक जिल्ह्यास पावसाने झोडपून काढल्याने धरणात येणारी आवक वाढती राहील
पैठण (औरंगाबाद): नाशिकच्या पुराचे पाणी दाखल झाल्याने गेल्या २४ तासात जायकवाडीच्या पाणीपातळीत पाऊन फुटाने वाढ झाली असून ५६.१९ दलघमी ( २ टीएमसी) पाण्याची भर पडली आहे. मंगळवारी रात्री धरणात ४५९३८ क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने आवक सुरू होती. वरच्या धरणातील विसर्ग लक्षात घेता आवक वाढणार असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. दरम्यान धरणाचा जलसाठा मंगळवारी सायंकाळी ४०% पेक्षा जास्त झाला होता.
नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेले पाणी सोमवारी मध्यरात्री जायकवाडी धरणात येऊन धडकले. जायकवाडी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अतिवृष्टी सुरू असून तेथील धरणातून गोदावरी पात्रात मोठ्या क्षमतेने विसर्ग सुरू आहेत. जायकवाडी धरणात मंगळवारी सकाळपासून आवक वाढत असल्याचे दिसून आले सायंकाळी ७ वाजेस धरणात ४५९३८ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती. आवक वाढणार असल्याने धरणाच्या पाणीपातळीत गतीने वाढ होणार असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.
मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील धरण समुहापैकी दारणा धरणातून १५०८८ क्युसेक्स, कडवा धरणातून ३५१७ क्युसेक्स, गंगापूर धरणातून १००३५ क्युसेक्स असा मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात येत होता. या सर्व धरणातील पाणी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात येते. तेथून गोदावरी पात्रात ७८२७६ क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने गोदावरी पात्रात मंगळवारी विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरी नदीला पुर आला आहे. प्रशासनाने नाशिक ते गंगापूर पर्यंत गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे. जायकवाडी धरणाच्या वर असलेल्या वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथील सरिता मापन केंद्रावर गोदावरी नदी ६२८०० क्युसेक्स क्षमतेने वहात असल्याची माहिती धरण अभियंता विजय काकडे यांनी दिली. १५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणी पातळी मंगळवारी रात्री ७ वा १५०८.७५ फूट ईतकी झाली होती. धरणात उपयुक्त जलसाठा ८६१.८६४ दलघमी झाला होता. आजही नाशिक जिल्ह्यास पावसाने झोडपून काढल्याने धरणात येणारी आवक वाढती राहील असे धरण नियंत्रण कक्षातून सहायक अभियंता गणेश खराडकर यांनी सांगितले.