नाशिकच्या एपीआय, तीन हवालदारांना लाच घेताना औरंगाबादेत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:09 PM2019-09-07T18:09:42+5:302019-09-07T19:08:33+5:30
अन्य गुन्ह्यात अटक न करण्यासाठी लाचेची मागणी
औरंगाबाद: अटकेतील आरोपीला गुन्ह्यात मदत करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना नाशिक मधील आडगाव ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस हवालदारांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने औरंगाबादेत रंगेहात अटक केली. ही कारवाई ६ सप्टेंबर रोजी रात्री चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत करण्यात आली.
सहायक पोलीस निरीक्षक योगेश चंद्रकांत पाटील, पोलीस नाईक अनिल दामाजी केदारे, पोलीस नाईक मिथून किसनराव गायकवाड आणि पोलीस शिपाई प्रदीप कचरू जोंधळे अशी अटकेतील पोलिसांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांनी सांगितले की, चिकलठाण्यातील चौधरी कॉलनी येथे राहणाऱ्या तक्रारदार महिलेचा भाऊ कैलास काकडे विरोधात नाशिकमधील आडगाव पोलीस ठण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात कैलासला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करणारे सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील हे अन्य तीन कर्मचारी यांचे पथक आरोपी कैलासला घेऊन औरंगाबादेत आले होते. तत्पूर्वी पोलीस नाईक केदारे यांनी तक्रारदार यांना फोन करून तुमच्या भावाला अटक झाली आहे. त्याला अन्य गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच पुढे मदत करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
याविषयी महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. दरम्यान शुक्रवारी रात्री सपोनि पाटील आणि अन्य कर्मचरी आरोपी कैलासला घेऊन औरंगाबादेतील चौधरी कॉलनीत आले. याविषयी माहिती मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चौधरी कॉलनीत दोन पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यावेळी सपोनि योगेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाच मागणी केली तेव्हा तक्रारदार यांनी चार हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. तेव्हा सर्वांनी संगणमत करून लाचेची रक्कम तक्रारदार यांच्या भावाकडे देण्यास सांगितले. तक्रारदार यांनी त्यांच्या भावाकडे लाचेचे चार हजार रुपये दिल्यानंतर आरोपी पोलिसांनी कैलासकडून लाचेची रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सपोनि पाटील आणि अन्य पोलीस हवालदारांना रंगेहात पकडले. सर्व आरोपीपोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांविरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक अनिता जमादार, उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश धोकरट, पोहेकॉ गणेश पंडुरे, पोलीस नाईक विजय ब्राम्हंदे आणि सुनील पाटील यांनी ही कारवाई केली.