मोजक्या मानकऱ्यांसह नाथमहाराजांच्या पालखीचे झाले प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 07:39 PM2020-06-12T19:39:35+5:302020-06-12T19:43:04+5:30
यंदा कोरोनामुळे पालखी सोहळा रद्द झाल्याने वारकऱ्यांना आज पैठणला येता आले नाही.
पैठण : आषाढीवारीसाठी आज नाथमहाराजांच्या पादुका असलेल्या पालखीने मोजक्या मानकऱ्यासह गावातील नाथ मंदिरातून प्रस्थान केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढीवारी पायी सोहळा राज्य शासनाने रद्द केल्याने शासकीय निर्देशानुसार मोजक्या मानकऱ्यासह आज पालखीचे प्रस्थान झाले. पालखी श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात पुढील १८ दिवस मुक्कामी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान आज पालखी मार्गावर अंगणात उभे राहून नागरिकांनी दुरुनच पालखीचे दर्शन घेऊन पुष्पवृष्टी केली. पालखी सोहळा रद्द झाल्याने सोहळ्यासोबत नियमित वारी करणाऱ्या वारकऱ्यांना यंदा मात्र मोठी रूखरूख लागल्याचे दिसून आले.
वारकरी संप्रदायास भागवत रूपी खांब देणारे व संप्रदायाची समतेची बंधुतेची पताका सदैव फडकवत ठेवणारे संत म्हणजे एकनाथ महाराज होय. बये दार उघड म्हणत शोषीत व पिचलेल्या मनात संघर्षाची ठिणगी टाकून त्यांना जागृत करणाऱ्या संत एकनाथ महाराजांची विचारधारा समस्त वारकऱ्यांनी आज ही तेवत ठेवली आहे. सुमारे ४२१ वर्षापासून सुरू असलेल्या आषाढीच्या पंढरपूर वारीसाठी मराठवाडा भरातून वारकरी नाथांच्या पैठण नगरीत जमा होत असतात व तेथून पुढे आनंदाने भानुदास एकनाथ असा जयघोष करित विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पालखी सोबत दरमजल करित रवाना होतात. परंतु, यंदा कोरोनामुळे पालखी सोहळा रद्द झाल्याने वारकऱ्यांना आज पैठणला येता आले नाही.
रघुनाथ महाराज पालखीवाले व २० मानकऱ्यांच्या उपस्थितीत भानुदास एकनाथ अशा गजरात गावातील नाथमंदिरातून पालखीचे प्रस्थान झाले. गागाभट्ट चौकातील पालखी ओट्यावर काही काळ थांबून पालखी बाहेरील नाथ मंदिरात नेण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष सुरज लोळगे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, जि प सदस्य विलास भुमरे, नगरसेवक भूषण कावसानकर, विष्णू मिटकर, सोमनाथ परळकर, रेखाताई कुलकर्णी, महेश जोशी, श्रीकृष्ण कुलकर्णी, चंद्रकांत आंबिलवादे, सतिश पल्लोड, गणेश पवार आदी उपस्थित होते.
वारीची ४२१ वर्षांची परंपरा
पैठण ते पंढरपूर या पालखी सोहळ्यास ४२१ वर्षांची परंपरा आहे. संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराज हे विठ्ठलभक्त होते; ते नियमीत पैठण ते पंढरपूर आषाढी वारी करायचे. त्यांच्या नंतर एकनाथ महाराज यांच्यापर्यंत पंढरपूर वारी सर्वांनीच नियमित केली.
नाथांच्या पादुकांची वारी
संत एकनाथ महाराज यांच्या नंतर त्यांचे पुत्र हरिपंडित महाराज यांनी पंढरपूर वारीसाठी संत एकनाथ महाराज यांच्या पादुका घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली, ती आज तगायत सुरू आहे. हरिपंडित महाराजांना वारीची प्रथा खंडित होऊ नये म्हणून निजाम राजवटीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, एका वारीला तर नाथ महाराजांच्या पादुका गुपचूप घेऊन जाण्याचा प्रसंग हरिपंडित महाराजांवर ओढावला होता. निजामाच्या शिपायांच्या लक्षात येऊ नये म्हणून त्यांनी पादुका डोक्यावर ठेवून त्यावर फेटा बांधून हरिपंडित महाराजांनी निजामाची हद्द पार केली, परंतु वारी मात्र खंडीत होऊ दिली नाही असे जेष्ठ नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी यांनी सांगितले.
आषाढीला विठ्ठल मंदिरात गोपालकाला
संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा भानूदास महाराज यांनी कर्नाटक (अनागोंदीच्या) राजाकडून पंढरपूर येथील मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती परत आणून पंढरपूर येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली असल्याचा इतिहास आहे. भानुदास महाराजांची पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात समाधी असून याच कारणाने नाथमहाराजांच्या पालखीस आषाढीला विठ्ठल मंदिरात गोपालकाला करण्याचा मान मिळालेला आहे. शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे.