नाथांची पालखी निघाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 01:00 AM2018-07-06T01:00:25+5:302018-07-06T01:01:41+5:30
धन्य आज दिन संत दर्शनाचा : हजारो भाविकांची उपस्थिती, पैठणमध्ये भक्तिभावाचे मंगलमय सूर
पैठण : ‘भानुदास एकनाथ’चा जयघोष करीत टाळमृदंगाच्या गजरात गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास संत एकनाथ महाराज यांच्या पादुका असलेली पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी पालखीस निरोप देण्यासाठी गागाभट्ट चौकातील पालखी ओट्याच्या मैदानात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. १९ दिवसांचा पायी प्रवास करीत ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पालखी संत एकनाथ महाराज यांच्या मंदिरातून मार्गस्थ होताच हेलिकॉप्टरमधून पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
मराठवाडा, खान्देश भागातील वारकरी पंढरपूर आषाढी वारीसाठी नाथ महाराजांच्या पालखीसोबत मोठ्या संख्येने जातात. यामुळे बुधवार दुपारपासूनच विविध वाहनाने जालना, परभणी, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जळगाव आदी भागातील वारकरी पैठण शहरात दाखल होत होते. शहरातील विविध मठात वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. सकाळपासून हरिनामाचा गजर करीत विविध दिंड्या पैठणच्या पालखीत सहभागी होण्यासाठी पैठण शहरात दाखल होत होत्या. दिवसभर वारकरी गरजेच्या वस्तू खरेदी करत असल्याचे चित्र आज पैठणनगरीत दिसून आले.
गुरुवारी दुपारी बारा वाजता पालखीप्रमुख रघुनाथबुवा गोसावी हे शेकडो वारकºयांसह शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पादुका घेण्यासाठी गावातील नाथवाड्यात दाखल झाले. यावेळी टाळ मृदंगाच्या निनादात, ‘धन्य आज दिन संत दर्शनाचा’ हा अभंग घेण्यात आला.
या ठिकाणी नाथवंशज हरिपंडीत गोसावी यांनी पादुकांचे विधीवत पूजन करुन नाथांच्या पवित्र पादुका पंढरपूरला जाणाºया पालखीसाठी पालखीप्रमुख रघुनाथ बुवा गोसावी यांच्या स्वाधीन केल्या. या पादुका पालखीत ठेऊन पालखी परंपरेनुसार गावातील मंदिरातून संत एकनाथ महाराज यांचा जयघोष करत बाहेरील नाथ समाधी मंदिरात गेली. तेथे भाविकांनी भक्तीभावाने समाधी दर्शन घेऊन पालखी भाविकांना दर्शनासाठी गागाभट्ट चौकातील पालखी ओट्यावर ठेवण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. त्यानंतर पालखी पंढरपूरला रवाना झाली.
पालखी ओट्याचे सुशोभिकरण
गोदावरीकाठी असलेला पालखी ओट्याची नगर परिषदेच्या वतीने रंगरंगोटी करण्यात आली होती, तसेच या ठिकाणी भव्य मंडप टाकण्यात आला होता. याच पालखी ओट्यावर भाविक व शहरातील नागरिकांच्या दर्शनासाठी नाथ महाराजांची पालखी ठेवण्यात येते. दर्शनासाठी पोलिसांनी योग्य नियोजन केल्याने आज पालखी ओट्यावर भाविकांना सुरळीत दर्शन घेता आले. नाथ महाराज पैठण येथून पंढरपूरला आषाढीसाठी जातात, ही भावना मनी धरून आज पालखी मार्गात गृहिणींनी सडा रांगोळी टाकली होती. पालखी या मार्गावरून जात असताना पालखीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.
पालखीस निरोप
पालखीस निरोप देण्यासाठी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड, तहसीलदार महेश सावंत, गट विकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, नगर परिषद मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, माजी आमदार संजय वाघचौरे, माजी आमदार चंद्रकांत घोडके, भाऊ थोरात, सोमनाथ परदेशी, निमेश पटेल, नगराध्यक्ष सूरज लोळगे, बांधकाम सभापती विलास भुमरे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक
दत्ता गोर्डे, उपनगराध्यक्ष सुचित्रा जोशी, रेखाताई कुलकर्णी, नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, शिवाजी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे, नंदलाल काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मोठ्या स्क्रीनवर प्रक्षेपण
नगर परिषदेच्या वतीने पालखी ओट्याच्या प्रांगणात १०० बाय २००चा भाविकांसाठी मंडप टाकण्यात आला होता तर पालखीचे दर्शन व सोहळा भाविकांना पाहता यावा म्हणून १० बाय १२चा एलईडी दूरदर्शन संच लावण्यात आला होता. पालखी सोहळा पैठणनगरीचा मोठा सण असल्याने या स्क्रीनवर थेट सोहळा पाहून भाविक हरखून गेले होते.
नाथ वंशजांनी काढली दुसरी दिंडी
आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान छय्या महाराज गोसावी यांनी गावातील नाथ मंदिरातून त्यांच्या देवघरातील नाथांच्या पादुका ठेवून पालखी काढली. ४ वाजेच्या सुमारास ‘एकनाथ भानुदास’चा जयघोष करीत ही दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली. या दिंडीत नाथवंशज व भाविक मोठ्या संखेने सहभागी झाले होते .
पावसाची हजेरी
संत एकनाथ महाराज यांच्या पालखीस निरोप देण्यासाठी हजारो भाविकांसह परंपरेप्रमाणे यंदाही पावसाने हजेरी लावली. जवळपास २२ दिवसांच्या विलंबानंतर पावसाने आज पैठण शहरात हजेरी लावल्याने भाविकांचा उत्साह दुणावला होता. वारकºयांनी मात्र पादुकावर मस्तक ठेवताना यंदा चांगला पाऊस पडू द्या, असे साकडे संत एकनाथ महाराजांना घातले.
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
यावर्षी प्रथमच नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी हेलिकॉप्टरने पालखी दिंडीवर पुष्पवृष्टी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, महेश जोशी आदी उपस्थित होते.
अश्वाची सोळावी आषाढी वारी
पैठण नाथगल्ली येथील रहिवासी महेश सोनवणे यांच्या अश्वाला नाथांच्या पालखीचा मान आहे. गेल्या १६ वर्षांपासून हा अश्व दिंडीत सहभागी असतो.
मोठा पोलीस बंदोबस्त
पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळास्थळी आज मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. बंदोबस्ताचे योग्य नियोजन झाल्याने भाविकांना यंदा सुरळीत दर्शन झाले.
महिलांनी फुगड्या तर पुरुषांनी खेळल्या पावल्या
हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार असल्याने महिला, पुरुष, वृद्ध, बाल, गोपालांनी पालखी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी महिला भाविकांनी फुगडी तर पुरूष भाविकांनी पावल्या खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला.