पैठणच्या नाथनगरीचे रूपडे पालटणार; कीर्तन मंडपातून दिसेल गोदावरी, नाथसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 07:56 PM2020-07-15T19:56:46+5:302020-07-15T20:02:53+5:30
औरंगाबादच्या पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने पैठण आगामी काळात आकर्षणाचा भाग ठरेल.
- विकास राऊत
औरंगाबाद : मराठवाड्यातील वारकऱ्यांसह सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या पैठण तीर्थक्षेत्राचे रूपडे हळूहळू पालटत असून, आगामी काळात जिल्ह्यातील महत्त्वाचे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसर उदयास येणार आहे.
२०११ साली शासनाने केलेल्या २१२ कोटींच्या एकूण तरतुदीपैकी आजवर १२५ कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. आता जिल्हा प्रशासनाने २० कोटी रुपयांच्या प्रसादालय, कीर्तन मंडप, पडसाळ नूतनीकरणाच्या कामांना मंजुरी दिली आहे. ही नवीन कामे नसून शासनाने प्राधिकरण आणि डीपीसीत मंजूर केलेली कामे आहेत. यासाठीचा निधी प्राधिकरणाच्या खात्यावर कोरोनाच्या संकटापूर्वीच आलेला आहे. मंदिर परिसरातील पडसाळ लाकूड आणि दगडांनी बांधले जाणार असून, त्यासाठी साडेचार कोटींचा खर्च होणार आहे. कामांचे तीन भाग होते, पैठण प्राधिकरणासाठी शासनाने २०११ साली २१२ कोटींचा आराखडा मंजूर केला होता. तो आराखडा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी तरतूद असलेल्या कामांसह बदलून टाकला.
आराखड्यातील कामे सोडून प्राधिकरण आणि डीपीसीत निधी असलेल्या कामांना मंजुरी दिली आहे. कोरोनामुळे नवीन कामे सुरू करायची नाहीत, असे शासनाचे आदेश असल्याने संकल्पित सर्व कामे मंजूर करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीने पैठण प्राधिकरणाला निधी दिलेला आहे. त्या कामांचा निधी पैठण प्राधिकरणाच्या खात्यात जमा आहे. नाथमंडपाचे मोठे स्ट्रक्चर होणार आहे, ते दोन मजली असून, त्यावर ९ कोटींचा खर्च होईल. त्यानंतर नवीन प्रसादालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे. नाथमंडपात कीर्तनाची सोय असेल. तेथे १५०० भक्तांची बसण्याची सोय असेल, असे त्याचे डिझाईन तयार केले आहे.
धार्मिक पर्यटनाचे आकर्षण ठरेल
प्राधिकरणाला किती जागा आहे हेदेखील माहिती नव्हते. संरक्षक भिंत बांधण्यापासून जागा ताब्यात घेण्यापर्यंतचे काम जिल्हा प्रशासनाने केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसता, तर मुख्यमंत्री यंदाच्या नाथषष्ठीला आजवर झालेल्या कामांचे उद्घाटन करण्यासाठी येणार होते. आगामी काळात ते येतील. दोन वर्षांत काम पूर्ण होईल या दिशेने तयारी केली आहे. दोन वर्षांत १२५ कोटींची कामे मंजुऱ्या देऊन पूर्णत्वाकडे नेली आहेत. औरंगाबादच्या पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने पैठण आगामी काळात आकर्षणाचा भाग ठरेल.
कीर्तन मंडपातून दिसेल गोदावरी, नाथसागर
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, कीर्तन मंडपातून नाथसागर आणि गोदावरी पात्र दिसेल, अशी बांधकामाची रचना आहे. तेथील दृश्ये पाहण्यासाठी भविष्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील याचा विचार करण्यात आला आहे. नाथमंदिर परिसरातील सर्व इन्फ्रास्ट्रक्चरला ४७ किलोवॅट वीजपुरवठा सोलारवरून होणार आहे. समाधी मंदिर परिसरातील पडसाळ पूर्ण तोडून नवीन बांधण्यात येणार आहे. पूर्ण दगडी बांधकाम करण्यात येणार आहे.
वूड आणि स्टोनमध्ये मंदिर परिसराचे बांधकाम होईल. त्यासाठी साडेचार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. भक्त निवास, कॉरिडॉरचे काम पूर्ण करण्यात आले आहे.