नाथसागर जोत्याखाली; शेकडो वर्षांचा वारसा उघडा पडल्याने भाविकांची गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 02:31 PM2019-06-13T14:31:54+5:302019-06-13T14:40:19+5:30

धरणामुळे विस्थापित झालेल्या गंगापूर तालुक्यातील सावखेडा गावांच्या खाणाखुणा पाणी आटल्याने आता दिसू लागल्या आहेत. 

Nathasagar Jayakwadi dam below water level; Hundreds of devotees have come for visit their lost legacy | नाथसागर जोत्याखाली; शेकडो वर्षांचा वारसा उघडा पडल्याने भाविकांची गर्दी 

नाथसागर जोत्याखाली; शेकडो वर्षांचा वारसा उघडा पडल्याने भाविकांची गर्दी 

googlenewsNext
ठळक मुद्देइतिहासाच्या पाऊलखुणा पाहण्यासाठी गर्दी

- राम शिनगारे 

औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पातील पाणी आटल्याने शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या महानुभाव संप्रदायातील चक्रधर स्वामी यांच्या ध्यानसाधनेने पावन झालेल्या सावखेडा गावातील पुरातन वास्तू, मंदिरांच्या खाणाखुणा दिसू लागल्या आहेत. तब्बल ४२ वर्षांपूर्वी पाण्यात बुडालेल्या या गावातील गणेश, दत्त, नृसिंह आदी मंदिरे उघडी पडली आहेत. कधी न दिसणारे वैभव पाहण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यासह नगर, जालना जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत.

मराठवाड्यातील जलसिंचन आणि विद्युतनिर्मितीसाठी १९६५ साली पैठण येथील गोदावरी नदीवर विशाल मातीच्या धरणाचे बांधकाम सुरू करण्यात आले. १९७६ साली धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. ९ हजार ९९७ मीटर (दहा किलोमीटर) लांबी आणि ४१.३ मीटर उंची असलेल्या या महाकाय धरणाने स्वत:च्या उदरात १०५ गावांना घेतले. ३५ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. जायकवाडीच्या विशाल जलाशयाला नाथसागर असे नाव देण्यात आले. हा नाथसागर २०१८ मध्ये दुष्काळ पडल्यामुळे शून्य टक्क्यांच्या खाली पाणीसाठा पोहोचला आहे. औरंगाबाद, जालना शहरांसह उद्योग आणि परिसरातील गावखेड्यांना मृत साठ्यातून पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या ‘बॅक वॉटर’खालची विस्तीर्ण भूमी भेगाळली आहे. धरणात रबी हंगामात गहू, टरबुजासह इतर पिकेही घेण्यात आली आहेत. मात्र, उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे पात्रातील पाणी आक्रसले आहे. 

धरणामुळे विस्थापित झालेल्या गंगापूर तालुक्यातील सावखेडा गावांच्या खाणाखुणा पाणी आटल्याने आता दिसू लागल्या आहेत. या ऐतिहासिक गावाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ११४२ मध्ये महानुभाव संप्रदायाच्या चक्रधर स्वामी यांनी भ्रमंती करीत असताना सावखेडा येथील खडकुली संस्थानला भेट दिली होती. यावेळी त्यांनी संगमेश्वर आणि चिंचकपाट येथे ध्यानधारणा केल्याचेही  पैठण येथील महंत चक्रपाणी बाबा शिवलीकर यांनी सांगितले. या दोन्ही ठिकाणाला भेट देण्यासाठी महानुभव संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. याचवेळी सावखेडा गावच्या परिसरातील पाण्यात गेलेले इतर हिंदू देवस्थानांचे कळस, भिंतीही उघड्या झाल्या आहेत. यात गणपती मंदिर, बाळकृष्ण महाराजांचा मठ, नृसिंह मंदिर, दत्त मंदिर, शंकर महाराज यांच्या मठाचा समावेश आहे. या ऐतिहासिक वास्तूपर्यंत जाण्यासाठी आताही बोटीचा वापर करावा लागतो. महंत चक्रपाणी बाबा शिवलीकर यांच्या सांगण्यानुसार या मंदिरांची निर्मिती ही यादव काळात झालेली असावी. 

४२ वर्षे पाण्याखाली, तरी भिंती मजबूत
जायकवाडी धरणाचे बांधकाम पूर्ण होऊन १९७६ पासून पाणीसाठ्याला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत नाथसागर भरल्यामुळे बॅक वॉटरमधील गावे पाण्याखाली बुडाली होती. तेव्हापासून दोन ते तीन वेळाच उघडी पडलेली सावखेडातील मंदिरे ४२ वर्षांपासून पाण्याखाली असली तरी मजबूत आहेत. दत्त मंदिरावर कोरलेल्या कलाकृती आताही ठळकपणे दिसतात. शंकर महाराज मठाच्या भिंतीवर ठिकठिकाणी शिवलिंग कोरलेले आहे. दरवाजासमोर नंदीही दिसतो. तो अद्यापही सुस्थितीत आहे. उर्वरित मंदिरांच्या भिती, दरवाजे टणक असल्याचे पाहणीत दिसून आले.

दर्शनासाठी भाविकांची गर्दी
मागील आठ दिवसांपासून महानुभव संप्रदायातील भाविकांनी चक्रधरस्वामी यांनी ध्यानधारणा केलेल्या खडकुली संगमेश्वर, चिंचकपाट या ठिकाणी भेटी देण्यासाठी गर्दी केली आहे. पर्यटकांसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या घेऊन भाविक या ठिकाणी नेवासे, पुनर्वसित सावखेडामार्गे येत आहेत.

विविध गावांचे अवशेष उघड
जायकवाडीत गडप झालेल्या विविध गावांचे, मंदिरांचे अवशेष यंदा उघडे पडले आहेत. यात गंगापूर व नेवासा तालुक्यांतील बहुतांश गावांचा समावेश आहे. या गावातील मदिरांनाही भेटी देणाऱ्यांची संख्या आठ दिवसांमध्ये चांगली वाढली आहे.

झाडांची खोडेसुद्धा दिसताहेत
दत्त मंदिर, नृसिंह मंदिर, शंकर मंदिर परिसरात मोठमोठी झाडे असल्याच्या खुणा अद्यापही कायम आहेत. चक्रधरस्वामी यांनी ध्यानधारणा केलेल्या चिंचकपाट या ठिकाणी चिंचेची मोठमोठी झाडे होती. या झाडांच्या खोबणीत बसून त्यांनी ध्यानधारणा केली. या चिंचेच्या झाडांची महाकाय खोडेही उघडी पडली आहेत. ४२ वर्षे पाण्याखाली असूनही झाडांची उभी खोडे पाहून भाविक आश्चर्यचकित होत आहेत.

पहा व्हिडिओ

Web Title: Nathasagar Jayakwadi dam below water level; Hundreds of devotees have come for visit their lost legacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.