नाथषष्ठी यात्रा रद्द मात्र २० मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार सोहळा; भाविकांचा सलग दुसऱ्या वर्षी हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 05:24 PM2021-03-27T17:24:34+5:302021-03-27T17:26:42+5:30
Nathashthi Yatra is canceled due to corona नाथषष्ठीची ४०० वर्षाची परंपरा असून तुकाराम बीजेपासून नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे.
पैठण : कोरोनाचे नियम पाळून २० मानकऱ्यासह नाथषष्ठीचे सर्व धार्मिक व पारंपरिक सोहळे पार पाडण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, या काळात भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे बंद राहणार आहेत. सलग दुसऱ्या वर्षी नाथषष्ठी यात्रा रद्द झाल्याने वारकरी संप्रदायात नाराजगी आहे.
कोरोनामुळे यंदा नाथषष्ठी यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला असला तरी नाथषष्ठी दरम्यान होणारी धार्मिक पूजाविधी पारंपरिक सोहळे खंडीत करता येणार नसल्याने मानकऱ्यांना नाथषष्ठी यात्रा साजरी करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी नाथवंशजांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली होती. या अनुषंगाने दि २५ रोजी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे व नाथवंशज यांची बैठक तहसील कार्यालयात घेण्यात आली. बैठकीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे , प्रभारी तहसीलदार दत्तात्रय निलावड , पोलीस निरीक्षक किशोर पवार, ज्येष्ठ नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी , रघुनाथ बुवा पालखीवाले, हरीपंडित महाराज गोसावी, आदीसह नाथवंशज उपस्थित होते.
नाथषष्ठीची ४०० वर्षाची परंपरा असून तुकाराम बीजेपासून नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. बैठकीत इतर देवस्थानच्या धर्तीवर मानकऱ्यांना सोहळा साजरा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जेष्ठ नाथवंशज रावसाहेब व हरिपंडीत महाराज यांनी केली. यानुसार २० मानकऱ्यासह सोहळा साजरा करण्याची परवानगी प्रशासनाने दिली. या सोहळ्यात मानकऱ्या व्यतिरिक्त इतर भाविकांना सहभागी होता येणार नसून तसे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा ईशारा देत यात्रा कालावधीत मंदीर बंद ठेवण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी सांगितले.
नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राजभरातील ४५० दिंडी प्रमुखांनी नोंदणी केली आहे. गत वर्षी नाथषष्ठी यात्रा महोत्सव प्रशासनाने रद्द केला होता तरीही वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून नाथमंदीराच्या बंद दरवाजाच्या बाहेरून दर्शन घेत वारी पूर्ण केली होती. यंदाही वारकऱ्यांकडून गतवर्षीची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. पंढरपूर यात्रेनंतर वारकरी संप्रदायाच्या दृष्टीकोनातून पैठण यात्रेचे मोठे महत्त्व आहे. पंढरपूर प्रमाणेच लाखो वारकरी हरिनामाचा गजर करीत दिंड्या घेऊन पैठणची वारी पूर्ण करतात सलग दुसऱ्या वर्षी यात्रा रद्द झाल्याने वारकरी संप्रदायात मोठी नाराजगी पसरली असल्याचे दिसून येत आहे.