'नेशन फर्स्ट'; सोशल मीडिया 'लाईव्ह'मधून भीमजयंती पोहचली ६ लाख घरांत

By सुमेध उघडे | Published: April 14, 2020 05:34 AM2020-04-14T05:34:45+5:302020-04-14T05:38:46+5:30

भीमजयंती : 'बोधिसत्व' फेसबुक पेजच्या माध्यमातून महिनाभर ऑनलाईन भीमजयंती

'Nation First'; Bhima Jayanti reaches 6 lakh houses through social media live | 'नेशन फर्स्ट'; सोशल मीडिया 'लाईव्ह'मधून भीमजयंती पोहचली ६ लाख घरांत

'नेशन फर्स्ट'; सोशल मीडिया 'लाईव्ह'मधून भीमजयंती पोहचली ६ लाख घरांत

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई ते परळीतून नामवंत गायक लाईव्ह७ एप्रिलपासून सुरू झालेली ऑनलाइन भीमजयंती महिनाभर चालणार

- सुमेध उघडे

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची भीम जयंती मोठ्याप्रमाणावर साजरी करता येणार नाही. मात्र 'बोधिसत्व' या फेसबुक पेजवर ऑनलाइन लोकसहभागातून वेगळ्या पद्धतीने भीमजयंती साजरी करण्यात येत आहे. ७ एप्रिलपासून दररोज संध्याकाळी ७ वाजता नामवंत कलाकारांचा आंबेडकरी 'जलसा' यावर सादर होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 'प्रथम आणि अंतिमतः भारतीय ' या विचारांचे पालन करत सुरू झालेली ही ऑनलाइन भीमजयंती १४ एप्रिलच्या पूर्वसंध्येपर्यंत ६ लाख घरात पोहचली असून संपूर्ण महिनाभर हा उपक्रम सुरू राहणार आहे.

देशविदेशात साजरी होणाऱ्या भीमजयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे आंबडेकरी जलसा आणि प्रबोधनात्मक व्याख्याने याची महिनाभर पर्वणी. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीम अनुयायांनी गर्दी करणारे उपक्रम टाळत साध्या पद्धतीने घरीच राहून भीमजयंती साजरी करण्याचे ठरवले आहे. दरम्यान, एकत्र जमता येत नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून जयंतीचे कार्यक्रम घराघरात पोहचवता येतील असा विचार निखिल बोर्डे या युवकाच्या मनात आला. त्याने लागलीच  'बोधिसत्व' या फेसबुक पेजच्या माध्यमातून ७ एप्रिलपासून नामवंत गायक-शाहीर यांचा 'जलसा' घराघरात पोचवण्याचे नियोजन केले. यात गायकांनी स्वतःच्या घरात राहून संध्याकाळी ७ वाजता बोधिसत्वच्या फेसबुक पेजवर लाईव्ह गायन सादर केले. याला सोशल मीडियात चांगला प्रतिसाद मिळाला असून १३ एप्रिलपर्यंत हे सादरीकरण ६ लाख घरात पोहचले आहे. सुरुवातीला केवळ १३ एप्रिलपर्यंतच हा 'ऑनलाइन भीमजयंती जलसा' नियोजित होता. मात्र लॉकडाऊन वाढल्याने आता ३० एप्रिलपर्यंत राज्यभरातील इतर नामवंत कलाकारांना घेऊन ही ऑनलाइन भीमजयंती पुढे चालूच राहणार असल्याचे निखिल याने सांगितले.

मुंबई ते परळीतून गायक लाईव्ह
ऑनलाईन भीमजयंतीची सुरुवात ७ एप्रिलला औरंगाबाद येथील अमर वानखेडे याने भीमगीतांचे सिंथ वादन सादर करत केली. यानंतर मुंबईतुन डॉ. गणेश चंदनशिवे यांनी पारंपरिक भीमगिते व शिरिष पवार यांनी भीमस्पंदन, जालन्यातुन प्रसिद्ध अभिनेते कैलास वाघमारे यांनी 'बाबासाहेब आणि मी' तर परळी येथून चेतन चोपडे यांनी "तुफानातले दिवे " हा भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला. यासोबतच औरंगाबादयेथून कुणाल वराळे यांनी 'युगपुरुष' व अजय देहाडे यांनी 'तुफानातले दिवे' याचे सादरीकरण केले. यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात आनंद शिंदे, उत्कर्ष शिंदे, साजन बेंद्रे, शितल साठे, सचिन माळी व आणखी प्रसिद्ध गायक येथे लाईव्ह सादरीकरण करणार आहेत अशी माहिती निखिल याने दिली.

देश हितासाठी पुढाकार
मी प्रथमतः व अंतिमतः भारतीय असे म्हणत बाबासाहेबांनी नेहमीच देशहिताच्या भूमिका घेतल्या.त्यांचे विचार डोक्यात घेत कोरोनाच्या संकट काळात सर्वांनी घरात राहणे गरजेचे आहे. यातूनच ऑनलाईन भीमजयंती ही संकल्पना पुढे आली. याला सर्व स्तरातून जबरदस्त प्रतिसाद मिळत असून संपूर्ण महिनाभर राज्यभरातील नामवंत कलाकार यावर लाईव्ह येतील. 
- निखिल बोर्डे, दि बोधिसत्व 


लोकमतने 'लाईव्ह' साठी केले होते आवाहन
लॉकडाऊन लागू होण्याआधी २१ मार्चला 'लोकमत'ने 'गर्दी टाळण्यासाठी सोशल मीडियावरील लाईव्हचा उत्तम पर्याय' अशी बातमी प्रसिद्ध करत या माध्यमातून नागरिकांना घरात राहूनच विविध कार्यक्रमात सहभागी होता येईल असे आवाहन केले होते. यानंतर विविध समाजाचे ऑनलाईन कार्यक्रम सुरू झाले. तर निखिल बोर्डे याने बोधिसत्व या फेसबुक पेजवरून सर्वात प्रथम ऑनलाईन भीमजयंतीचा उपक्रम सुरू केला. यानंतर अनेक संस्था आणि मान्यवरांनी हा पर्याय वापरणे सुरू केले आहे. 

Web Title: 'Nation First'; Bhima Jayanti reaches 6 lakh houses through social media live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.