राष्ट्रीय अकॅडमीमुळे प्रतिभावान खेळाडूंची फळी निर्माण होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 06:24 PM2018-07-08T18:24:22+5:302018-07-08T18:28:26+5:30
औरंगाबाद येथे साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात तलवारबाजी खेळाच्या राष्ट्रीय अकॅडमीस केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. या अकॅडमीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिभावान खेळाडूंची एक फळी भारताला मिळेल, असा विश्वास अखिल भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त अशोक दुधारे यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. विभागीय क्रीडा संकुलावर शुक्रवारपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेनिमित्त अशोक दुधारे यांचे औरंगाबादेत आगमन झाले. याप्रसंगी त्यांनी लोकमतशी तलवारबाजी खेळाचा विकास आणि खेळाडूंच्या प्रगतीचा ग्राफ याविषयी विशेष संवाद साधला.
जयंत कुलकर्णी ।
औरंगाबाद : औरंगाबाद येथे साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात तलवारबाजी खेळाच्या राष्ट्रीय अकॅडमीस केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. या अकॅडमीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिभावान खेळाडूंची एक फळी भारताला मिळेल, असा विश्वास अखिल भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त अशोक दुधारे यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
विभागीय क्रीडा संकुलावर शुक्रवारपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेनिमित्त अशोक दुधारे यांचे औरंगाबादेत आगमन झाले. याप्रसंगी त्यांनी लोकमतशी तलवारबाजी खेळाचा विकास आणि खेळाडूंच्या प्रगतीचा ग्राफ याविषयी विशेष संवाद साधला. अशोक दुधारे म्हणाले, ‘‘राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या कामगिरीचा ग्राफ उंचावलेला आहे. १९९४ ते २००५ पर्यंत महाराष्ट्राला एखाद, दुसरे कास्यपदक मिळायचे; परंतु त्यानंतर आपण सचिवपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर १२ वर्षांखालील राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा घेतल्या. त्याचा फायदा आता राष्ट्रीय पातळीवर अनेक सुवर्णपदक विजेते खेळाडू महाराष्ट्राला मिळाले आहेत. शालेयस्तरावरही १४, १७ आणि १९ वयोगटातील स्पर्धेचा समावेश झाला. त्यामुळे खेळाडूंची कामगिरी आणखी उंचावण्यास व त्यांना आवश्यक स्पर्धेचा अनुभवही वाढला आहे. त्याचा फायदाही मिळत असून एनआयएस प्रशिक्षकही आता लाभत आहेत.’’
‘मिशन २०२४ आॅलिम्पिक’नुसार आम्ही दर दोन महिन्यांनी १४ वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करीत आहोत. सध्या महाराष्ट्रात राज्य संघटनेशी संलग्नित १७ हजार खेळाडू आहेत. त्यातून आम्हाला प्रतिभावान खेळाडू मिळत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
तलवारबाजी हा खेळ खूप महागडा असल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नसल्याचे दुधारे यांनी मान्य केले. एका खेळाडूस राष्ट्रीय पातळीवर साहित्यासाठी १५ ते २० हजार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळासाठी ५० ते ६० हजार रुपयांचे तलवारबाजी खेळाचे साहित्य लागते. यासाठी राज्य शासनाने क्रीडा प्रबोधिनीत तलवारबाजी खेळाचाही समावेश करावा. ज्यायोगे प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असणाऱ्या मुलांना क्रीडा प्रबोधिनीद्वारे आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल आणि असे झाल्यास महाराष्ट्राचे खेळाडू आशिया आणि आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत निश्चितच चमकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मध्यप्रदेशमध्ये खेळाडूंना विक्रम पुरस्कार देऊन गौरविण्यात येते व त्याचबरोबर त्याला नोकरीदेखील दिली जाते. त्यांच्याप्रमाणेच महाराष्ट्र शासनानेही शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूंना नोकरी द्यायला हवी. त्यामुळे खेळाडूंच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटेल. सांगली व पुणे महानगरपालिकेत शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांना नोकरी देण्याचा ठराव करण्यात आला आहे. महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांनीही त्यांचा आदर्श घेऊन तशी सुरुवात करायला हवी. त्यामुळे खेळाडू त्याच शहरात राहून प्रतिभावान खेळाडू घडवतील, असे ते म्हणाले. राज्य संघटनेतर्फे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना खेळाडूंना साहित्य देण्यासाठी अर्धा खर्च देण्यात येत असल्यची माहितीही त्यांनी दिली. औरंगाबादेत ‘खेलो इंडियांतर्गत’ तलवारबाजी खेळाची राष्ट्रीय अकॅडमीस मान्यता मिळाली आहे. एका खेळाडूवर सरकार पाच लाख रुपये खर्च करणार आहे. या अकॅडमीसाठी १४ ते १७ वर्षांखालील एकूण ६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कमी वयात मार्गदर्शक म्हणून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित आणि राज्य संघटनेचे सचिव उदय डोंगरे यांच्या योगदानाविषयीही त्यांनी प्रशंसा केली. औरंगाबादचे उदय डोंगरे यांनी तलवारबाजी खेळाला वाहून घेतले असून, त्यांच्या योगदानामुळे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या पदकांची संख्या सातत्याने वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरही कामगिरी सातत्याने उंचावत आहे. भारतीय संघ दक्षिण आशियाई स्पर्धेत चॅम्पियन आहे. तसेच आशियाई स्पर्धेत पहिल्या आठ जणांत तर कॉमनवेल्थमध्ये पहिल्या ४ ते ५ जणांत भारतीय संघ आहे. राष्ट्रीय अकॅडमी स्थापन झाल्यानंतर २०२४ मध्ये भारतीय खेळाडू आॅलिम्पिकमध्ये आपला विशेष ठसा उमटवतील, असा विश्वास वाटतो.
-अशोक दुधारे
कोषाध्यक्ष, अ. भा. तलवारबाजी महासंघ