छत्रपती संभाजीनगरात नॅशनल करन्सी रॅकेट; शेकडो बँक खात्यातून कोट्यवधींचे बेनामी व्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 12:48 PM2024-09-12T12:48:01+5:302024-09-12T12:48:22+5:30
गुप्तचर यंत्रणा, पोलिसांच्या कारवाईत करन्सी रॅकेट उघडकीस; देशविघातक कृत्यासाठी पैसे वापरले जात असल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुणांच्या नावे बँक खाते उघडून विविध राज्यांमधून त्याद्वारे व्यवहार करायचा. भारतात बंदी असलेल्या आभासी चलनात (व्हर्च्युअल करन्सी गुंतवून पुन्हा विविध देशांच्या चलनात रूपांतर करून कोट्यवधींचा बेनामी व्यवहार करणारे करन्सी रॅकेट उघडकीस आले आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनंतर शहर पोलिसांनी गुजरातच्या तरुणासह शहरातील दोन तरुणांना बुधवारी अटक केली.
उत्सवकुमार चंदुभाई भेसानिया (२३, रा. सूरज, गुजरात), ऋषिकेश शिवनाथ भागवत (२३, रा. सिंहगड कॉलनी, एन-६) व अनुराग भाऊसाहेब घोडके (२१, रा. म्हसोबानगर, जाधववाडी) अशी आरोपींची नावे आहेत. शहरात अनेक महिन्यांपासून हे रॅकेट सुरू होते. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर बुधवारी कारवाईचे आदेश दिले. उत्सवकुमार निराला बाजार येथील हॉटेलात मुक्कामासाठी आल्याची माहिती मिळाली होती. निरीक्षक संभाजी पवार, गीता बागवडे, अशोक भंडारे, सहायक निरीक्षक राजेंद्र बनसोडे, मोसीन सय्यद, कदीर देशमुख यांनी छापा टाकला. तेव्हा तिघेही मोबाईलद्वारे बँकेचे व्यवहार करताना रंगेहाथ सापडले.
कसे चालते रॅकेट ?
दिवसाला लाखांचे व्यवहार, नंतर खाते बंद
- उत्सवकुमार, ऋषिकेश व अनुरागच्या सहा महिन्यांपासून संपर्कात आहे.
- अनुराग, ऋषिकेश शहरातील मित्र परिवार, तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कागदपत्रे घेऊन बँक खाते उघडतात. या बँक खात्यांना जोडण्यासाठी मोबाईल क्रमांक मात्र उत्सवकुमार देत होता.
- खाते उघडल्यानंतर कार्ड, पासबुक, चेकबुकही उत्सवकुमार घेऊन जात होता. त्या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा होतात.
- त्यातून रोख काढून पुन्हा सीडीएम मशिनद्वारे अन्य खात्यांमध्ये टाकले जातात. मग ते क्रिप्टो, यूएसडीटीमध्ये गुंतवून पुन्हा भारतीय चलनात रुपांतरित करायचे.
- विशेष म्हणजे, ठराविक व्यवहारानंतर खाते बंद केले जाते.
ब्लॅक मार्केट, डार्क नेटचा वापर
आरोपी सर्व व्यवहार, घेवाण-देवाण, खाते उघडण्याची प्रक्रिया करण्यासाठी डार्क नेट म्हणजेच देशात बंदी असलेले डकडक गो सर्च इंजिन, ट्रस्ट वॉलेटचा वापर करत होते. त्यामुळे त्यांच्या हेतूवर देखील तपास यंत्रणांना मोठा संशय आहे.
७ ते १० हजार रुपये
उत्सवकुमार व त्याचे सूत्रधार देशभरात रॅकेटसाठी तरुणांना पैशांचे आमिष दाखवून हेरतात. ऋषिकेश, अनुरागने शहरातील अनेक तरुणांच्या नावे बँक खाते उघडून सूत्रधारांना चालवण्यासाठी देतात. यासाठी खातेधारकाला ७ ते १० हजार रुपये दिले जातात. शहरातील नामांकित महाविद्यालयांचे तरुण या रॅकेटमध्ये अडकले आहेत. ऋषिकेश कॉलेज ड्राॅप आऊट तर अनुराग विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे.
यापूर्वी देखील चौकशी
या प्रकारच्या रॅकेटशी संबंधित शहरातील तरुणांची यापूर्वी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी केली होती. हा पैसा अवैध व्यवसायांसह देशविरोधी कृत्यांसाठी वापरला जात असल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे. न्यायालयाने त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली.