औरंगाबाद येथे घाटीत लवकरच राष्ट्रीय आपत्कालीन जीवन संरक्षण प्रशिक्षण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 06:23 PM2018-03-05T18:23:50+5:302018-03-05T18:24:46+5:30
सुपर स्पेशालिटी विभाग, आयुष रुग्णालयापाठोपाठ केंद्र सरकारच्या सहकार्याने घाटी रुग्णालयात राष्ट्रीय आपत्कालीन जीवन संरक्षण कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.
औरंगाबाद : सुपर स्पेशालिटी विभाग, आयुष रुग्णालयापाठोपाठ केंद्र सरकारच्या सहकार्याने घाटी रुग्णालयात राष्ट्रीय आपत्कालीन जीवन संरक्षण कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. केंद्रीय पथकाने बुधवारी (दि.२८) केलेल्या पाहणीत या केंद्रासाठी जुन्या वॉर्ड क्रमांक ७ च्या परिसरातील जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
डॉ. जितेंद्र अरोरा, डॉ. ए.जी. अलोनो, वास्तुविशारद एस.के. गौर यांनी ही पाहणी केली. या केंद्रासाठी पथकाने घाटीतील काही जागांची पाहणी के ली. अखेर मेडिसिन विभागाच्या परिसरातील ६७० चौ.मी. जागेची निवड करण्यात आली. महाराष्ट्रात चार ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
यामध्ये औरंगाबादेतील घाटी रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. जवळपास १ कोटी १० लाख रुपये खर्चाच्या बांधकामातून हे केंद्र उभारले जाईल.
अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. शिवाजी सुक्रे, मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ. विजय गायकवाड, डॉ. कैलास चितळे, डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. अनंत बीडकर आदींची पाहणीप्रसंगी उपस्थिती होती. या केंद्राच्या उभारणीसाठी समन्वयक म्हणून डॉ. विजय गायकवाड हे काम पाहत आहेत. पाहणीनंतर केंद्राच्या जागेसंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला. केंद्र शासनामार्फतच संपूर्ण उभारणी होणार असल्याचे डॉ. भट्टाचार्य यांनी सांगितले. डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकलचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या केंद्राची उभारणी केली जात आहे. यातून आपत्कालीन परिस्थितीत वेळीच प्राथमिक उपाचारासह विविध कौशल्य आत्मसात करण्यासंदर्भात मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे.